बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नांत असलेल्या स्लीपर सेलच्या मागावर तपास संस्था | पुढारी

बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नांत असलेल्या स्लीपर सेलच्या मागावर तपास संस्था

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबपाठोपाठ देशाची राजधानी दिल्लीत स्फोटके सापडल्याने तपास संस्था सावध झाल्या असून, चारही ठिकाणी सापडलेल्या स्फोटकांमध्ये समानता असल्याचेही दिसून आले आहे. दहशतवादी संघटनांच्या मदतीने पाकच्या ‘आयएसआय’ने देशाला अस्थिर करण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला असल्याचे तपास संस्थांनी स्‍पष्‍ट केले आहे.

जम्मू काश्मीर, पंजाबमार्गे स्फोटके भारतात पाठवून ठिकठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. याकामी त्यांना स्थानिक स्लीपर सेलची मदत मिळत आहे. या स्लीपर सेलच्या मुसक्या आवळण्याचा तपास संस्थांचा निर्धार आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत सीमापुरी आणि गाजीपूर आयईडी स्फोटके पेरल्याचे आढळून आले होते. विशेष म्हणजे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सापडलेल्या स्फोटकांशी येथे सापडलेल्या स्फोटकांशी समानता दिसून आली आहे. एकाच गटाचे दहशतवादी स्फोट घडवून आणण्याच्या प्रयत्नात असावेत, या संशयाला यामुळे बळ मिळाले आहे.

केवळ दिल्लीच नव्हे तर देशाच्या विविध भागात स्लीपर सेल कार्यरत असल्याचाही तपास संस्थांचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात जे मॅग्नेट आणि टायमर सापडले होते, तसेच मॅग्नेट आणि टायमर इतर ठिकाणी आढळले आहेत. सर्व ठिकाणी एका लोखंडी बॉक्समध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते, ही बाबदेखील लक्षात घेण्यासारखी आहे. दरम्यान केंद्रीय तपास संस्थांनी सर्व राज्यांच्या पोलिसांना सावधानतेचा इशारा जारी केला आहे.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button