सांगली : काँग्रेस, भाजपचा बहिष्कार; राष्ट्रवादीने रेटली महासभा | पुढारी

सांगली : काँग्रेस, भाजपचा बहिष्कार; राष्ट्रवादीने रेटली महासभा

सांगली : पुढारी वृत्तसेवा
ऑफलाईन महासभेसाठी काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महापालिकेच्या ऑनलाईन महासभेवर बहिष्कार घातला. राष्ट्रवादीने ऑनलाईन महासभा रेटून पार पाडली. काँग्रेसचे तीन नगरसेवक व भाजपचे काही फुटीर नगरसेवक ऑनलाईन महासभेत सहभागी होते. दरम्यान, सभा कोरम पूर्ण होता, असा दावा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. काँग्रेस व भाजपने मात्र कोरम अभावी झालेली महासभा बेकायदेशीर असून मंजूर झालेले सर्व विषय रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे
केली. न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला आहे.

काँग्रेस व भाजपने ऑनलाईन महासभेला विरोध केल्याने शुक्रवारच्या ऑनलाईन महासभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी दहा-साडेदहा वाजता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवक महापालिकेत दाखल झाले. राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठक महापौर
सूर्यवंशी यांच्या दालनात झाली. गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक शेडजी मोहिते, विष्णू माने व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपचे काही फुटीर नगरसेवकही राष्ट्रवादीसोबत होते. काँग्रेसचे तीन नगरसेवकही महासभा व्हावी यासाठी प्रयत्नशील होते.

काँग्रेस नगरसेवकांची बैठक विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या दालनात झाली. नगरसेवक उत्तम साखळकर, संतोष पाटील, अभिजित भोसले व काँग्रेसचे नगरसेवक ऑफलाईन महासभेसाठी आग्रही होते. ऑनलाईन महासभेवर बहिष्कार टाकण्यावर ठाम राहिले.
भाजप नगरसेवकांची बैठक गटनेते विनायक सिंहासने यांच्या दालनात झाली. भाजपचे नेते नगरसेवक शेखर
इनामदार, सिंहासने, स्थायी सभापती निरंजन आवटी, समाजकल्याण सभापती सुब्राव मद्रासी, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपेपाट ील व भाजप नगरसेवक उपस्थित होते.

शिराळा : शिराळ्यात पुन्हा गव्यांचे दर्शन ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महापौर महासभेत…

राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या तीनही पक्षांच्या गोटात महासभेवरून तासभर स्वतंत्र बैठक व चर्चा झाली. साडेअकरा वाजल्यानंतर महापौर सूर्यवंशी सभागृहात गेले. तत्पूर्वी नगरसचिव व अधिकारी सभागृहात उपस्थित झाले होते. महापौरांनी सभा
सुरू केली. महावीर उद्यान, आमराई, चिल्ड्रन पार्क प्रवेश शुल्कचा विषय रद्द केला. शामरावनगर येथील स.नं. 507 ची जमीन मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीसाठी संपादन करणे व त्यासाठी खर्चास मान्यतेचा विषय मंजूर केला. मिरज येथील गार्डनचे आरक्षण बदलून दफनभूमीसाठी आरक्षण फेरबदलाच्या विषयावर नागरिकांकडून सूचना, हरकती घेण्याचे निर्देश सूर्यवंशी यांनी दिले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय, एक (ज) खालील सर्व विषयावर सभा कामकाज झाले. काही नगरसेवकांचे प्रश्न झाले. काँगे्रस व भाजपचा बहिष्कार असल्याने दीड तसात महासभा संपली.

निदर्शने, घोषणाबाजी

काँग्रेस व भाजप नगरसेवकांनी महापालिका प्रवेशद्वारात निदर्शने केली. महासभा घेतल्याने महापौर व राष्ट्रवादीच्या निषेधार्थ भाजपने
घोषणाबाजी केली. ‘कोरमअभावी झालेली महासभा बेकायदेशीर असून महासभेत मंजूर झालेले विषय रद्द करण्यासाठी प्रधान सचिव,
विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करावा. कोरम अपूर्ण असताना सभा चालविल्याबद्दल नगरसचिवांवर कारवाई करावी’, अशा मागणीचे पत्र काँग्रेस, भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले. काँग्रेस, भाजपने स्वतंत्र निवेदन दिले, त्यातील मजकूर मात्र सेम टू सेम होता. काँग्रेसचे तीन, भाजपचे काही फुटीर नगरसेवक सभेत ऑफलाईन महासभेवर काँग्रेस, भाजपने बहिष्कार घातला होता. प्रभागातील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमीचा विषय महासभेपुढे असल्याने काँग्रेस नगरसेवक तौफिक शिकलगार, मयूर पाटील, मंगेश चव्हाण यांनी गटनेत्यांचा निर्णय बाजूला ठेवत थोड्या कालावधीपुरते ऑनलाईन सभेत सहभाग घेतला. दफनभूमीचा विषय असल्याने भाजप नगरसेविका नसिमा नाईक यांनीही महासभेत सहभाग घेतला. नाईक यांच्यासह भाजपचे फुटीर नगरसेवक महासभेत राष्ट्रवादीसोबत राहिले.

महासभेत 32 नगरसेवक : महापौर सूर्यवंशी

महापौर सूर्यवंशी म्हणाले, महासभा तीन महिन्यांनी होत आहे. ऑनलाईन महासभेचा शासन आदेश आहे. अशा परिस्थितीत ऑफलाईनसाठी ऑनलाईन महासभा रद्द करू शकत नव्हतो. जे विषय महत्वाचे आहेत व त्यावर पुरेशी चर्चा होऊ शकणार नाही ते प्रलंबित ठेवू, असा पर्याय काँग्रेस व भाजपला दिला होता. त्यांनी तो मान्य केला नाही. ऑनलाईन महासभेला 32 नगरसेवक होते. सभेचा कोरम पूर्ण होता.

सभा बेकायदा, विषय रद्द करा : मेंढे, सिंहासने

काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने म्हणाले, रेल्वे, विमान, शाळा, बाजार सर्व काही सुरळित सुरू आहे. केवळ महासभाच ऑनलाईन का? महासभेपुढे साठ-सत्तरहून अधिक विषय होते. विषयांना विरोध नव्हता, पण ऑनलाईन सभेत व्यवस्थित चर्चा होत नाही. त्यामुळे ऑनलाईन सभा रद्द करून ऑफलाईन सभेची शासनाकडे मागणी करू, अशी मागणी केली होती. मात्र महापौरांनी कोरम नसताना बेकायदेशीरपणे महासभा चालवली. त्यामुळे महासभा बेकायदा ठरवून मंजूर केलेले विषय रद्द करावेत.

बेकायदा सभेविरोधात न्यायालयात : इनामदार

भाजपचे नेते शेखर इनामदार म्हणाले, महासभेपुढे अनेक महत्वाचे व आर्थिक विषय होते. काही विषय पेंडींग ठेवू व महासभा तहकूब करून ‘ऑफलाईन’साठी पाठपुरावा करू, यासाठी भाजप नगरसेवक आग्रही होते. महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने सभेवर बहिष्कार टाकावा लागला. कोरमअभावी झालेल्या सभेविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत.

हेही वाचलत का ?

Back to top button