चरणजीतसिंह चन्‍नी यांचे वक्‍तव्य ठरतेय भाजपसाठी ‘संजीवनी’ | पुढारी

चरणजीतसिंह चन्‍नी यांचे वक्‍तव्य ठरतेय भाजपसाठी ‘संजीवनी’

चंदीगड; पंकजकुमार मिश्रा: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्‍नी यांच्या ‘भय्या’ वक्‍तव्याने पंजाब विधानसभेच्या रणधुमाळीत काहीसा मागे सुटलेल्या भाजपला मुख्य प्रवाहात आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चन्‍नी यांच्या वक्‍तव्याची तुलना थेट श्री गुरू गोविंदसिंह आणि गुरू रविदास यांच्या अपमानाशी करीत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

शेतकरी आंदोलनाचे केंद्र असलेल्या पंजाबमध्ये भाजपला मोठे राजकीय यश मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु, भाजपने गावोगावी कॅडर तयार केले आहे. त्यांच्याच बळावर निवडणुकीनंतर पंजाबमध्ये एक मोठी राजकीय शक्‍ती बनून उभे राहण्याचा पक्षाचा मानस आहे.  (चरणजीतसिंह चन्‍नी )

राजकारण अनेक शक्यतांनी भरलेले आहे. हीच शक्यता भाजप चन्‍नी यांच्या वक्‍तव्यात शोधत आहे. भाजप एका सुनियोजित राजकीय व्यूहरचनेंतर्गत चन्‍नी यांच्या ‘भय्या’ वक्‍तव्याविरोधात यशस्वी आघाडी घेताना दिसून येत आहे. 17 फेब्रुवारीला अबोहर येथील सभेत पंतप्रधानांनी चन्‍नी यांच्या वक्‍तव्याला गुरू रविदास महाराज आणि श्री गुरू गोविंदसिंह यांच्या अपमानाशी जोडले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर या सर्व नेत्यांच्या भाषणांतून भाजपने ज्याप्रकारे चन्‍नी यांच्या वक्‍तव्याला उत्तर प्रदेश आणि बिहारचा अपमान सांगत काँग्रेसला घेरले, तसे आप आणि शिरोमणी अकाली दलाला करता आले नाही.

भाजपने पंजाबमध्ये प्रवासी मतदारांना आकर्षित करण्यासह उत्तर प्रदेशात काँग्रेसला घेरण्यासाठी चन्‍नीच्या वक्‍तव्याला एक मोठा मुद्दा बनवले आहे. चन्‍नी यांच्या वक्‍तव्याच्या वेळी प्रियांका गांधी-वधेरा टाळ्या वाजवत होत्या. परंतु, चन्‍नी यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. चन्‍नी यांचे हे स्पष्टीकरण काँग्रेसचे किती डॅमेज कंट्रोल करू शकेल हे येणारा काळ सांगेल. तूर्त या मुद्द्यावर भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button