सांगलीच्या मॅकॅनिकचा जुगाड! भंगारातून ३० हजारांत बनवली 'फोर्ड कार' | पुढारी

सांगलीच्या मॅकॅनिकचा जुगाड! भंगारातून ३० हजारांत बनवली 'फोर्ड कार'

सांगली, पुढारी वृत्‍तसेवा : सांगलीत भंगारातील साहित्यापासून बनविलेल्या जिप्सीनंतर आता एका सातवी शिक्षीत मॅकॅनिकने अवघ्या 30 हजार रूपयांत फोर्ड कार 1930 ची प्रतिकृती बनविलेली आहे. एम 80 च्या इंजिनपासून बनविलेल्या या गाडीची सध्या सांगलीत जोरदार चर्चा आहे. एम 80 पासून जुगाड गाडी बनविलेल्या या मॅकॅनिकचे अशोक आवटी असे नाव आहे. शहरालगत काकानगर येथे त्यांचा गॅरेजचा व्यवसाय असून त्यांनी केवळ आवड म्हणून ही गाडी बनविली आहे.

आवटी यांचे ट्रॅक्टर आणि दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. 2019 च्या लॉकडाऊनच्या काळामध्ये युट्युबवर त्यांनी काही व्हिडिओ बघितले आणि आपल्या लहान मुलांसाठी काही तरी वेगळे पण चारचाकी गाडी बनवता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू केला.

तब्बल अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि परिश्रमानंतर एक भन्नाट चारचाकी गाडी त्यांनी बनवली. हुबेहूब 1930 सालच्या फोर्ड गाडी प्रमाणे त्यांनी ही गाडी तयार केली आहे. विशेष म्हणजे भंगारातील आणि दुचाकी व रिक्षाच्या साहित्यातून ती गाडी तयार केली आहे.
या गाडीचे इंजिन हे एम 80 दुचाकीचे आहे. गाडी सुरू करण्यासाठी रिक्षा प्रमाणे हँडल आहे. विशेष म्हणजे त्यांनी एम 80 च्या इंजिनला रिव्हर्स गिअर बसविला आहे. हा गिअरबॉक्स त्यांनी स्वत: बनविला आहे.

स्टेरिंग हा छोट्या ट्रॅक्टरचा आहे, तर चाके ही एम 80 दुचाकीची आहेत. तीन गियर असणारी ही चारचाकी फोर्ड गाडी प्रती लिटर 30 किलोमीटर इतके मायलेज देते. चार व्यक्ती या गाडीमध्ये बसण्यासाठी त्यांनी ही गाडी साकारली आहे. या गाडीला आरटीओची परवानगी नसली तरी ती शहरात धावू लागल्याने सर्वांचे आकर्षण बनली आहे.

तर नुकतेच देवराष्ट्रे येथील फॅब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रय लोहार यांनी देखील अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचे इंजन वापरून जुगाड जिप्सी तयार केली आहे. याची दखल अगदी आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली होती. त्यामुळे ही गाडी सध्या चर्चेचा विषय बनली होती.

हे ही वाचा :

Back to top button