सांगली :  चोरावर मोर..! | पुढारी

सांगली :  चोरावर मोर..!

सांगली : इथल्या एका स्थानिक स्वराज्य संस्थेत झालेल्या एका भानगडीचा गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभर बोभाटा सुरू आहे. आता जिल्हाभर बोभाटा होतोय म्हटल्यावर ती संस्थाही त्या तोलामोलाचीच असली पाहिजे. हो, ही संस्था आहेच तशी. आजपर्यंत एकदा नव्हे तर कित्येकवेळा जिच्या कारभाराचा आणि कारभार्‍यांच्या कारनाम्यांचा गल्‍लीपासून ते पार दिल्‍लीपर्यंत डंका वाजलाय, अशी ही जिल्ह्यातील एक बहुचर्चित आणि नामांकित स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थेच्या कारभार्‍यांच्या कारभाराबद्दल काय बोलावे, अहो यांच्यापेक्षा जनावरांच्या बाजारातील ‘हेडे’ परवडले, पण हे नकोत. दलाली, कमिशन, टक्केवारी या शब्दावाचून या कारभार्‍यांचं पानही हलत नाही आणि कुणी कितीही आकांडतांडव केले, आदळआपट केली म्हणून या संस्थेला आणि तिच्या कारभार्‍यांना काही फरक पडत नाही, अशी ही नामांकित संस्था आहे.

तर काही दिवसांपूर्वीच या संस्थेतील एका ‘प्रमुख कारभार्‍याची’ निवड करायची होती. आता ही निवड आणि डाकूंच्या सरदाराची निवड यात फरक तो काय असणार म्हणा, पण आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे बहुमताने ही निवड होणे अपेक्षित होते. दिसेल त्यात टक्केवारी हाणायची सवय लागलेल्या या कारभार्‍यांना ही निवड म्हणजे ‘खिंडीत गाठून लुटायची चालून आलेली पर्वणी’ वाटली नसती तरच नवल! झाले, प्रमुख कारभार्‍याच्या निवडीसाठी ‘बोली’ लागायला सुरूवात झाली आणि बघता बघता एका एका कारभार्‍याच्या मताला ‘दहा पेट्या’ दर निघाला. प्रमुख कारभारी होऊ पाहणाराही काही कच्चा नव्हता, वंशपरंपरागत पद्धतीने अनेकवेळा हा बहुमान त्याच्या घराला मिळालेला होता. त्यामुळे निवडीच्यावेळी गुंतवणूक कशी करायची आणि नंतर कारभार करताना ती व्याजासह कशी वसूल करायची, याचं बाळकडू त्याला वडिलोपार्जित पध्दतीनेच मिळाले होते. त्यामुळे निवडीच्यावेळी या बहाद्दराने अजिबात हात आखडता घेतला नाही. प्रत्येकाच्या मागणीनुसार त्याने दहा-दहा पेट्या त्यांच्या पदरात टाकल्या आणि एकदाचा त्या गादीवर बसला आणि पदरात पडलेलं दहा पेट्यांचं गठुळं घेवून कारभारी आपापल्या वाटेला लागले.

पण कहाणी इथेच संपत नाही तर इथूनच खरी सुरू होते. त्याच काय आहे की, गेल्या पाच-सहा महिन्यांपासून एक भामटा भलं मोठं जाळं घेवून या जिल्ह्यात फिरत होता. दोन नंबरचा पैसा माझ्याकडं गुंतवा, सहा महिन्यात डबल किंवा दामदसपट करून देतो, असे सांगून या भामट्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. या माध्यमातून या भामट्याने शेकडो खोक्यांचं डबोलं गोळा केलं आहे. वरील संस्थेतील प्रमुख कारभार्‍याच्या निवडीची आणि त्यात सुरू असलेल्या दलालीची या भामट्याला कुणकुण लागलीच होती. त्यामुळं तो या टक्केवारी बहाद्दरांच्या मागावरच होता. दहा-दहा पेट्यांचं गठुळं घेऊन निघालेल्या या कारभार्‍यांना या भामट्याने नेमके गाठले आणि आपल्या लाघवी बोलण्यानं आपसूक त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ पैशाचाच विचार करणारी ही मंडळी त्यात पुरती गुरफटली.

आधीच या कारभार्‍यांना हे दहा पेटीचं गठुळं कुठं लपवायचं, याची चिंता होतीच. त्यामुळे आपले पैसे सुरक्षितरित्या दडवून ठेवणारा हा भामटा म्हणजे त्यांना जणू काही देवदूतच वाटला, त्यामुळे आठ-दहा कारभार्‍यांनी आपलं जवळपास एक कोटी रूपयांचं गठूळं या भामट्याच्या हवाली केलं. शिवाय सहा महिन्यात ते दामदसपट करून देण्याचे आमिषही या भामट्याने दाखविले होते. त्यामुळे ‘आम के आम गुठलियोंके दाम’, अशा आनंदात ही मंडळी आपापल्या घरी परतली. आता थोड्याच दिवसात आपल्या दहा पेट्यांचं ‘एक खोकं’ होणार, त्याच्या जोरावर आपणही मुख्य कारभारी होणार, जमलं तर आमदार होणार, जोडीला बंगला-गाडी अशी दिवास्वप्नंही यापैकी काहीजणांना पडू लागली. पण हाय रे दैवा, ‘खोकं’ तर दूरच पण आपलं दहा लाखाचं गठूळं ‘खाक’ झालेलं बघायची वेळ या बहाद्दरांवर आली आहे, त्यामुळे आजकाल ही मंडळी दिसेल तिथे कपाळावर हात मारून आणि ऊर बडवून घेताना दिसत आहेत.
कारण आपल्या सर्व गुंतवणूकदारांना…
“आणिले पैसे तुझे तू आणि दिले माझ्या करी,
का, किती, केंव्हा, कुणा ते सर्व तू विसरून जा,
ज्यास लेखी ना पुरावा, जे कुणी न पाहिले,
घेतले मोजून जे मी, तेच तू विसरून जा!”

अशा एका विडंबनकाराच्या शब्दात ठेंगा दाखवून या भामट्याने चक्क दुबईला पलायन केले असल्याची वार्ता आहे. गुंतवणूकदारांचे शेकडो खोक्यांचं डबोलं पाठीवर लादून हा भामटा परदेशी पसार झाल्याच्या वार्तेमुळे गुंतवणूकार हैराण झाले आहेत. त्यामुळे दलालीपोटी मिळालेल्या दहा-दहा पेट्यांची गुंतवणूक करणार्‍या कारभार्‍यांवर मात्र आजकाल ‘बापासारखा बाप गेला आणि बोंबलताना हात गेला’, असे म्हणून स्वत:च्याच गालफाडात मारून घेण्याची वेळ आली आहे. एका बहाद्दराने तर बाथरूमच जवळ केले असल्याचे समजते. चोरीला चटावलेल्या या कारभार्‍यांची आणि त्या चोरांवर मोर झालेल्या त्या भामट्याची आजकाल जिल्हाभर चविष्ट चर्चा सुरू आहे. आता तो भामटा परदेशातून कधी परतणार आणि आपलं गठूळं कधी परत मिळणार, याच्या प्रतीक्षेत ही मंडळी आजकाल जणूकाही ‘स्टँडअप’ पोझिशनमध्येच आहेत.
– सुनील कदम

Back to top button