देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला! २४ तासांत १ लाख ९४ हजार नवे रुग्ण, ४४२ जणांचा मृत्यू | पुढारी

देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला! २४ तासांत १ लाख ९४ हजार नवे रुग्ण, ४४२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९४ हजार ७२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६०,४०५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे ९ लाख ५५ हजार ३१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ११.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,८६८ एवढी झाली आहे.

याआधीच्या दिवशी देशात कोरोनाबाधितांच्या वाढीचा आलेख थोडा स्थिरावल्याचे दिसून आले होते. सोमवारी दिवसभरात १ लाख ६८ हजार ६३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २७७ रूग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.३६ टक्के नोंदवण्यात आला होता. पण आता रुग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून आले आहे.

सुरक्षा दलातील जवानांनी कोरोनाची लागण होत आहे. सध्या बीएसएफमधील ७२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सशस्त्र सीमा दलातील ५६२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात ४८१ निवासी डॉक्टरांना लागण

महाराष्ट्रात आतापर्यंत ४८१ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने दिली आहे.

अमरावतीमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला!

अमरावतीत कोरोनाचा पुन्हा एक नवीन व्हेरीयंट (B.1.606) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोना संक्रमण झपाट्याने वाढविणारा ओमायक्रॉन, डेल्टासह आणखी एका नवीन व्हेरियंटची भर पडली आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना हा नवीन व्हेरियंट आढळून आला. कॅनडा तसेच यूएसमध्ये देखील हा व्हेरियंट आढळून आल्याची माहिती आहे. नवीन व्हेरीयंटमुळे संक्रमणात भर पडू नये म्हणून नागरिकांनी सर्तक राहणे गरजेचे आहे.

कोरोना उपचारातून ‘मोल्नुपिरावीर’ औषध रद्द

कोरोनावरील उपचार पद्धतीत ‘मोल्नुपिरावीर’ औषधाचा समावेश करू नये, असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) कोरोनाविषयक राष्ट्रीय टास्क फोर्सने काढला आहे. ‘मोल्नुपिरावीर’च्या अनुषंगाने सुरक्षाविषयक चिंता असल्याचे गेल्या आठवड्यात ‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले होते. अँटिव्हायरल ड्रग ‘मोल्नुपिरावीर’चा वापर १५ ते ४५ वयोगटातील महिला कोरोनाग्रस्तांवर करण्यात येऊ नये, असा इशारा ‘नॅशनल टेक्निकल अ‍ॅडवायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन’नेही मंगळवारी दिला होता.

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ…

दरम्यान, ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत ७०,७६५ रुग्ण आढळून आले आहेत. तर १४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Back to top button