सातारा; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सातार्यात 'स्वाभिमान दिवस' म्हणून साजरा केला जातो. बुधवार, दि. 12 जानेवारी रोजी त्यांचा 314 वा राज्याभिषेक दिन व 12 वा सातारा स्वाभिमान दिवस आहे. किल्ले अजिंक्यतार्याच्या राजसदरेवर राज सन्मानात हा सोहळा साजरा होणार आहे.
सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी आहे. सन 1708 रोजी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैदेतून सुटल्यानंतर शाहू महाराजांनी वसवलेले सातारा हे भारतातील एकमेव शहर आहे. हे शहर वसवल्यानंतर शाहू महाराज यांचा राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मदिनी मंचकारोहण तथा राज्याभिषेक झाला. शाहू महाराज छत्रपती झाले आणि सातारा राजधानी झाली.
हिंदुस्थानच्या इतिहासात हिंदवी स्वराज्याचा सर्वाधिक राज्यविस्तार झाला तो छत्रपती शाहू महाराजांच्या काळात. अटकेपार झेंडे रोवण्याचा आदेश याच किल्ले अजिंक्यतार्यावरून फर्मावण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यात छ. शाहू महाराजांना यश आले.
इतिहासकार छ. शाहू महाराजांना शिवरायांची सावली म्हणून संबोधतात. हाच तो काळ होता. की जेव्हा कवी भूषण दिल्लीत फिरताना सातार्याला पती आणि या पतीच्या अभिमानात नटलेली दिल्ली असे संबोधत होते. छत्रपती शाहू राज्याभिषेक हा महाराष्ट्र व हिंदुस्थानासाठी अभिमानाचा तसेच सातार्याच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. हाच सातारा स्वाभिमान दिवस बुधवारी किल्ले अजिंक्यतार्याच्या राजसदरेवर साजरा होत आहे. त्यामुळे सातारकर व इतिहासप्रेमी यांच्यामध्ये या दिवसाबद्दल अभिमानाची भावना आहे.