

Raj Thackeray Explains China's Gaokao Exam: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशातील शिक्षण व्यवस्था, NEET परीक्षा, कोचिंग क्लासेस, कुंभमेळ्याची तयारी आणि निवडणूक प्रक्रियेसह अनेक विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विशेषतः चीनमधील ‘गाओकाओ’ (Gaokao) परीक्षेचा उल्लेख करत भारतातील परीक्षा व्यवस्थेवर कठोर टीका केली.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी खेळाडू दिलीप गावित यांची भेट न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. गावित भेटायला आले होते, याची माहितीच आपल्याला देण्यात आली नव्हती, त्यामुळे गैरसमज निर्माण झाला, असे ते म्हणाले. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण व्यवस्थेवर बोलताना राज ठाकरे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका लेखाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, चीनमध्ये ‘गाओकाओ’ ही उच्च शिक्षणासाठीची अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते. यावर्षी या परीक्षेला सुमारे 1.33 कोटी विद्यार्थी बसले, तर भारतात NEET परीक्षेला सुमारे 22 लाख 70 हजार विद्यार्थी बसले होते.
राज ठाकरेंनी सांगितलं की, चीनमध्ये प्रश्नपत्रिका अत्यंत कडक सुरक्षेत तयार केल्या जातात. त्यांची वाहतूक GPS यंत्रणेद्वारे केली जाते, पोलिस संरक्षण दिले जाते आणि ज्या ठिकाणी नोटा छापल्या जातात, त्याच दर्जाच्या सुरक्षेत प्रश्नपत्रिका छापल्या जातात. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांनाही परीक्षेपर्यंत बाहेरील संपर्कापासून दूर ठेवले जाते.
याशिवाय परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून बांधकामे थांबवली जातात, वाहनांच्या हॉर्नवर निर्बंध घातले जातात, वाहतुकीचे नियोजन बदलले जाते आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात, असेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, भारतात मात्र दरवर्षी परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. NEET परीक्षेतील गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक नुकसान झाले असून काही विद्यार्थ्यांनी टोकाचे निर्णयही घेतले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न सरकारने अत्यंत गांभीर्याने हाताळले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, CJP आंदोलन ही केवळ सुरुवात आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण झालेला संताप भविष्यात आणखी वाढू शकतो.
राज ठाकरे यांनी खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या प्रभावावरही प्रश्न उपस्थित केला. दहावीनंतर विद्यार्थी कॉलेजपेक्षा कोचिंग क्लासमध्ये अधिक वेळ घालवत असल्याचे सांगत, शिक्षण व्यवस्थेवर कोचिंग उद्योगाचा प्रभाव वाढल्याची टीका त्यांनी केली.
महागड्या फी, कॉलेज आणि कोचिंग क्लासेसमधील संगनमत आणि पेपरफुटीच्या घटनांमध्ये काही क्लासेसची नावे समोर येत असल्याने सरकारने या क्षेत्रावर कठोर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर बोलताना त्यांनी शहरातील रस्त्यांची अवस्था, खड्डे, झाडांची कत्तल आणि विकासकामांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळची तयारी समाधानकारक दिसत नाही.
कुंभमेळ्याशी संबंधित अनेक कंत्राटे महाराष्ट्राऐवजी गुजराती कंत्राटदारांना दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी मतदार यादी पडताळणी (SIR) प्रक्रियेवरही शंका उपस्थित केली. पडताळणीदरम्यान काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते फिरत असल्याचे आरोप त्यांनी केले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाला निष्पक्ष भूमिका घेण्याचे आवाहन केले.
पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. देशातील शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण करण्याची गरज असल्याचे सांगत, सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.