Raj Thackeray : ‘राज’भेटीची प्रतीक्षा, 2 तास ताटकळत ठेवलं; कॉमनवेल्थ ‘गोल्डन बॉय’ दिलीप गावित ठाकरेंना न भेटताच माघारी परतला

Commonwealth gold medalist Dilip Gavit video : समजूत काढण्याचा प्रयत्न, पण...
dilip gavit raj thackeray meeting commonwealth gold medalist runner returns without meeting
Published on
Updated on

नाशिक : नाशिक दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रकूल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित यांची प्रस्तावित भेट वेळेच्या अभावामुळे होऊ शकली नाही. दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते; मात्र सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर भेट न होताच त्यांना परतावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या भेटीचे आयोजन केले होते. त्यानुसार दिलीप गावित व प्रशिक्षक वैजनाथ काळे नाशिक येथील विश्रामगृहावर पोहोचले. मात्र, राज ठाकरे यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे भेटीसाठी वेळ लागू लागल्याने, "भेट द्यायची नव्हती तर बोलावलं कशाला?" असा प्रश्न प्रशिक्षकांनी सुरुवातीला पदाधिकाऱ्यांना विचारला. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, माध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता, प्रशिक्षकांनी विषयावर पडदा टाकत आपली कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. खेळाडूच्या सरावाची वेळ निश्चित असल्याने आणि पुढील सराव चुकवू नये यासाठी आपण निघत असल्याचे सांगत त्यांनी माघारी जाणे पसंत केले.

जिद्द, संघर्ष अन् सुवर्ण यश!

जिद्द आणि अथांग परिश्रमांच्या जोरावर नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील सुपुत्र दिलीप महादू गावित याने क्रीडा जगतात भारताची पताका पुन्हा एकदा उंच फडकावली. कॉमनवेल्थ पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर T47 प्रकारात १०.७१ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत दिलीपने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

संघर्षमय प्रवास

नाशिकजवळील 'तोरण डोंगरी' या आदिवासी गावातील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिलीपचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक राहिला आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी शेतात काम करताना झाडावरून पडल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. अत्यंत हलाखीची परिस्थिती आणि योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे जखमेत संसर्ग पसरला; परिणामी डॉक्टरांना त्याचा एक हात कापावा लागला. मात्र, या अपंगत्वावर मात करत दिलीपने आपल्या ध्येयाचा पाठलाग सोडला नाही.

शिक्षकाची पारखी नजर अन् नवा मार्ग

दिलीपच्या या क्षमतेला योग्य दिशा देण्याचे काम त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी केले. शालेय वयातच त्यांनी दिलीपमधील धावपटू ओळखला आणि त्याच्या पालकांची समजूत काढून त्याला क्रीडा क्षेत्राकडे वळवले. विशेष म्हणजे, सुरुवातीला दिलीपला 'पॅरा' क्रीडा प्रकारांबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. तो सामान्य खेळाडूंसोबतच शर्यतींमध्ये उतरायचा आणि तिथेही अव्वल कामगिरी करायचा.

शेवटच्या ४० मीटरमध्ये पलटवार करत सुवर्णपटकावले

कॉमनवेल्थच्या अंतिम शर्यतीदरम्यान पावसाने हजेरी लावल्यामुळे ट्रॅक ओला झाला होता आणि खेळाडूंना धावताना कठीण जात होते. शर्यतीच्या सुरुवातीच्या ६० मीटरपर्यंत दिलीप काहीसा मागे होता. मात्र, अत्यंत संयम राखत शेवटच्या ४० मीटरमध्ये त्याने जबरदस्त वेग घेतला आणि सर्व स्पर्धकांना मागे टाकत ऐतिहासिक सुवर्णपदक आणि विक्रमी वेळेची नोंद केली.

४०० मीटरचा चॅम्पियन आता १०० मीटरचा बादशाह

प्रशिक्षकांनी सुरुवातीला ट्रॅकवरील ४०० मीटर T47 प्रकारासाठी त्याला तयार केले होते. यापूर्वी २०२३ च्या आशियाई पॅरा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते, तसेच पॅरालिम्पिकमध्येही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. आता ४०० मीटरपाठोपाठ १०० मीटरच्या धावण्याच्या शर्यतीतही सुवर्णपदक जिंकून दिलीपने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news