

अलिबाग : अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. भरघाव वेगाने वाहन चालविणे हे नित्याचेच झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात सोमवारी (दि.२५) स्कॉर्पिओ गाडी सुमारे ७०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील रस्त्यांचा आढावा घेतला असता, वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरावस्था, भरधाव वाहने यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनली असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्हा पोलिस दूरक्षेत्र हद्दीत दिवसाला जवळपास २ ते ३ अपघात होत आहेत. जानेवारी ते एप्रिल २०२६ कालावधीत रायगड पोलीस दुरक्षेत्र हद्दीत २५४ अपघात झाले असून, या अपघातांमध्ये ९९ जणांचा मृत्यू झाला असून, ३०५ जण जखमी झाले आहेत.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलिस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई हाती घेतली आहे. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या कमी करण्यात यश मिळाले आले तरी जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील चार महिन्यात जिल्ह्यात २५४ अपघात झाले असून, यामध्ये ९९ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची प्रमुख कारणे
महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे.
रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने.
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे.
कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसर्या बाजूला नेणे.
मद्य पिऊन वाहन चालविणे
धोकादायक वळणे.
रस्ते अपघात दृष्टिक्षेप (जानेवारी ते एप्रिल)
मार्ग - अपघात : मृत्यू : जखमी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग - ३५ : ९ : २१
मुंबई-पुणे जुना महामार्ग - ३० : ५ : ४१
मुंबई-गोवा महामार्ग - ५१ : २६ : ७२
वडखळ-अलिबाग - १४ : ७ : ४
ताम्हिणी घाट-माणगाव-दिघी - ९ : ५ : ६०
कर्जत-खोपोली-वाकण-आगरदांडा - ९ : ३ : ९
पेण-खोपोली - ४ : २ : ३
अंतर्गत राज्यमार्ग - ४६ : १९ : ५६
इतर मार्ग - ५६ : २३ : ३९