

महाड : सामाजिक समतेचा क्रांतिकारी संदेश देणाऱ्या महामानवांनी २० मार्च १९२७ रोजी केलेल्या चवदार तळे सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त महाड शहरात विविध कार्यक्रम आणि विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाने या निमित्ताने सुमारे ५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा जाहीर केला असून, ही सर्व कामे नगरपरिषद यंत्रणेकडून एमआयडीसी विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मात्र, या निधीतून नेमकी कोणती कामे हाती घेतली जाणार आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती न दिल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, पालिका प्रशासनाने याची माहिती जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चवदार तळे सत्याग्रह हा भारतीय समाजव्यवस्थेतील विषमता आणि अस्पृश्यतेविरुद्ध उभारलेला एक ऐतिहासिक लढा मानला जातो. सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांवर सर्वांना समान हक्क मिळावा या मूलभूत अधिकारासाठी केलेल्या या आंदोलनामुळे महाडचे नाव देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
शताब्दी वर्ष हा केवळ उत्सवाचा क्षण नसून सामाजिक समतेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचवण्याची मोठी संधी असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या ५५ कोटी रुपयांच्या निधीतून चवदार तळ्याचे सुशोभीकरण, परिसर विकास, स्मारक उभारणी, ऐतिहासिक माहिती केंद्र, रस्ते व पायाभूत सुविधा सुधारणा, पर्यटकांसाठी निवास व स्वच्छतागृहे तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन अशा विविध कामांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व कामांचा अधिकृत आणि सविस्तर आराखडा सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याने नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, इतक्या मोठ्या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता राखणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला जाणार, कामांचा प्राधान्यक्रम काय असेल, कामे पूर्ण होण्याचा कालावधी किती असेल, याची स्पष्ट माहिती शासनाने जाहीर करावी. तसेच या विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र देखरेख यंत्रणा उभी करावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, अनेक सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींनी या शताब्दी वर्षाच्या नियोजनात नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे. केवळ प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्याऐवजी स्थानिक इतिहास जाणणारे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांना या प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यास विकासकामांना अधिक अर्थपूर्ण दिशा मिळू शकते, असे मत व्यक्त होत आहे. महाड शहरात दरवर्षी देशभरातून हजारो अनुयायी आणि पर्यटक चवदार तळे पाहण्यासाठी येतात.
शताब्दी वर्षानिमित्त हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करणे अत्यावश्यक मानले जात आहे. वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पार्किंग, माहिती केंद्रे आणि मार्गदर्शक सुविधा यांचा विकास करणे गरजेचे आहे. याशिवाय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्यावरही भर देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवून नव्या पिढीपर्यंत समतेचा संदेश पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
आराखडा महाडच्या विकासासाठी महत्त्वाचा
एकूणच, चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त जाहीर करण्यात आलेला ५५ कोटी रुपयांचा विकास आराखडा हा महाडच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची संधी मानली जात असली, तरी त्याची सविस्तर माहिती तातडीने जाहीर करून पारदर्शकतेने अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे. शासनाने याबाबत लवकरच स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.