

अलिबाग : पश्चिम आशियाई देशातील युद्धामुळे देशात पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये तणाव वाढत आहे. त्यातच घरगुती गॅसचे दर वाढण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी तणाव वाढत आहे. रायगड जिल्ह्यातही याचा परिणाम दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप आणि घरगुती गॅस वितरकाकडे नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.
जगातील काही भागांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या संदेशांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून त्याचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही दिसू लागला आहे.
अलिबागसह परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या दोन दिवसांपासून अनपेक्षितपणे वाहनांच्या लांब रांगा दिसत आहेत. विशेष म्हणजे या रांगांमध्ये अशी अनेक वाहनेही दिसत आहेत जी नियमितपणे रस्त्यावर वापरात नसतात. ‘उद्या पेट्रोल मिळणार नाही’ या भीतीमुळे अनेक नागरिकांनी अतिरिक्त पेट्रोल भरून ठेवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
दरम्यान, इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण राज्यामध्ये एलपीजी सुरळीत ठेवण्याविषयी तसेच पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याची नागरिकांनी निश्चिंतता बाळगावी, अशी ग्वाही अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
गॅस सिलिंडर पुरवठ्या संदर्भात नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व सरकारी गॅस कंपन्यांचे अधिकारी यांचा या समित्यांमध्ये समावेश असेल. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे ही समित्यांची प्रमुख जबाबदारी असेल.
पर्यायी इंधनाच्या वापराची शक्यता तपासण्याचे निर्देशही यंत्रणांना देण्यात आले आहेत. यामध्ये कोळसा, रॉकेल आदी पर्यायांचा विचार केला जाणार असला तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच जिल्हास्तरीय समित्यांनी हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांसोबत बैठक घेऊन पर्यायी इंधनाच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत.
गॅस पुरवठ्याबाबत अफवा पसरू नयेत, यासाठी दररोज रेडिओ, एफएम, दूरदर्शन तसेच मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा समित्या यांसंदर्भातील जबाबदारी पार पाडतील. समाज माध्यमांवरील खोट्या, बनावट बातम्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे विभागाने म्हटले आहे.
रुग्णालये, शासकीय वसतिगृहे, शासकीय शाळा/महाविद्यालयांमधील मेस, मध्यान्ह भोजन योजना, शासकीय आश्रमशाळा आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांना घरगुती/व्यावसायिक गॅसचा पुरवठा प्राधान्याने देण्यात येणार असून अशा संस्थांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने देण्यासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रमही निश्चित केला जाणार आहे.
रायगड जिल्ह्यातील घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही. घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणारा एलपीजी गॅस केवळ घरगुती कारणांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. रायगड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असल्याने घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत नागरीकांनी चिंताग्रस्त होण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी घरगुती गॅसचा अनावश्यक साठा करून ठेवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवून घाईगडबडीत गॅस घेण्याचा प्रयत्न करू नये. रायगड जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नसल्याने नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.