

अलिबाग ः रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रात्री उशीरा झालेल्या बैठकीत सुटल्यानंतर, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (शिंदे) महायुतीने रायगड जिल्हा परिषदेत एकत्र येवून सत्ता आज स्थापन केली. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान विषय समीत्यांच्या सभापती पदांची निवड जिल्हा परिषदेच्या येत्या 23 मार्च रोजी होणाऱ्या सभेत होणार असल्याने शिंदे शिवसेनेला कोणती सभापतीपदे मिळणार याकरिता 23 मार्च पर्यंत त्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी जिल्हा नियोजन भवन येथे गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, तसेच यांच्या विरोधात इतर कुणीही अर्ज न भरल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.
दरम्यान सकाळी अकरा वाजता अध्यक्षपदासाठी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, शिंदे शिवसेनेचे जि.प.सदस्य विकास गोगावले, शिवसेना नेत्या मानसी दळवी, रसिका केणे, दिलीप भोईर, चंद्रकांत कळंबे, ॲड.आस्वाद पाटील, डॉ.चित्रा पाटील, सुधाकर घारे, ॲड. प्रवीण ठाकूर, अनंत गोंधळी यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत निवडणूक पूर्व भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असल्याने दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र राज्य सरकारमध्ये एकत्र असल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेत आपल्याला सामावून घ्यावे यासाठी शिवसेना (शिंदे) नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह इतर भाजप नेत्यांकडे मागणी केली होती. यांनतर गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी-भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सव्वा वर्ष कार्यकालाबाबत बैठकीत निर्णय होईल ः तटकरे
दरम्यान शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी काल पहिली सव्वा वर्ष भाजपा, दुसरी सव्वा वर्ष शिंदे शिवसेना, तीसरे सव्वावर्ष राष्ट्रवादी काँग्रेस तर अखेरचे सव्वा वर्ष पून्हा शिंदे शिवसेना हा सत्तेचा फॉर्मूला सांगीतला होता. मात्र या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना विचारले असता, त्यांनी या बाबत आता बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे सांगीतले असल्याने, हा फॉर्म्यूला अद्याप अंतिम झाला नसल्याचे या निमीत्ताने स्पष्ट झाले आहे.
सत्तास्थापनेपूर्वी सदस्यांची फूट पडू नये तसेच कोणताही राजकीय दगाफटका होवू नये यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नव्याने निवडून आलेल्या सर्व सदस्यांना गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये जवळपास महिनाभर ठेवले होते. त्यांना आज सभेपूर्वी अलिबाग येथे आणण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या कारभारातून सुशासन - वाकडीकर
रायगड जिल्हा परिषदेत माझ्या सह निवडून आलेल्या सर्व म्हणजे 59 सदस्यांनी मला बिनविरोध निवडून दिल्याने मी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सद्यांबरोबरच शिवसेना (शिंदे), शिवसेना (उभाठा) आणि काँग्रेस पक्षांच्या जि.प.सदस्यांचे आभार व्यक्त करतो. आता आम्ही सगळे एक आहोत. माझ्या रुपाने रायगड जिल्हा परिषदेत भाजपाचे अध्यक्ष प्रथमच होत आहे याचा मोठा आनंद आहे. आणि रायगड जिल्हा परिषदेच्या कारभारातून रायगडच्या जनतेला आम्ही सुशासन देणारा आहोत अशी पहिली भावना नवनिर्वाचीत अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
ग्रामीण विकासालाच प्राधान्य देणार ः मधुकर पाटील
रायगड जिह्याच्या ग्रामीण भागातील समस्या सोडवून, विकासाकरिता आवश्क ते सर्व प्रयत्न माझ्याकडून केल जातील. ग्रामीण भागातील रस्त्यापासून विविध समस्या आहेत, त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहीले असे, नवनिर्वाचीत उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र ः मंत्री आदिती तटकरे
प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या निवडणुकांमध्ये जिल्ह्याच्या व्यापक हितासाठी महायुतीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार जागांचे वाटप करुन आज अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यात आली असल्यचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगीतले. या निवडीत महायुतीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तसेच काँग्रेस सोबतही सकारात्मक चर्चा झाली असून, सर्वानुमते जिल्ह्याच्या विकासासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोप-प्रत्यारोप टळण्यासाठी भाजपाची सुशासन सभा रद्द
रायगड जिल्हा परिषदेवर भाजपाचा प्रथमच अध्यक्ष विराजमान होणार या पार्श्वभूमीवर आज दुपारी भाजपाच्या वतीने सुशासन सभेचे आयोजन येथील समुद्र किनाऱ्यावर मोठा मंडप घालून केले होते. मात्र ही सभा रद्द करण्यात आली.
मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांची दांडी
रायगड जिल्हा परिषदेच्या आजच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रीयेकडे शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह शिंदे सेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पूर्णपणे पाठफिरवली होती. तीघेही गैरहजर राहील्याने महायुती म्हणून झालेल्या निर्णया बाबत त्यांची नाराजी आहे का अशी चर्चा आज सुरु होती. परिणामी आता येत्या 23 मार्च रोजी होणाऱ्या विषय समिती सभापती पदाच्या बाबतीत तसेच पाच वर्षांचा कार्यकाल वाटपा बाबत त्यांची वेगळी मागणी असू शकते अशी माहिती या वेळी प्राप्त झाली आहे.