

उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातील न्हावा शेवा बंदरावर रोल-ऑन, रोल-ऑफ (रो-रो) सुविधा सुरू करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन केली. ही सेवा सुरू केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, रोजगार वाढेल आणि उद्योजकांनाही फायदा होईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे यांनी सोनोवाल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याबाबतचे सविस्तर निवेदन दिले. खासदार बारणे म्हणाले, पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा औद्योगिक पट्टा आहे. देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून हा औद्योगिक भाग ओळखला जातो. या औद्योगिक पट्ट्यात 11 हून अधिक प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादन कारखाने आणि 4 हजाराहून अधिक सहायक युनिट्स आहेत. ज्यामुळे हा प्रदेश ऑटोमोबाईल निर्यातीसाठी महत्त्वाचा बनतो.
या भागात बजाज ऑटो, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा फोक्सवॅगन, मर्सिडीज-बेंझ, ह्युंदाई, जनरल मोटर्स फोर्स मोटर्स, पियाजिओ, हिरो मोटोकॉर्प हे ऑटोमोबाईल उत्पादक आहेत. सध्या रो-रो केवळ दक्षिण मुंबईतील मुंबई बंदर प्राधिकरण येथे उपलब्ध आहेत. दिवसा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि प्रवेशबंदीमुळे या भागात गंभीर परिणाम होतात. यामुळे केवळ लॉजिस्टिक विलंब होत नाही तर निर्यातदारांच्या वाहतूक खर्चातही लक्षणीय वाढ होते.
न्हावा शेवा येथे पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्याचा वापर रो-रो सेवेसाठी सुरू करता येईल. या सुविधेमुळे ऑटोमोबाईल उत्पादकांसाठी निर्यात लॉजिस्टिक्स सुलभ होईल. नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. हा उपक्रम सरकारच्या मेक इन इंडिया आणि व्यवसाय सुलभतेच्या दृष्टिकोनाशी देखील सुसंगत असेल.
या विषयावर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षांशी नुकतीच माझी चर्चा झाली आहे. त्यांनी बीएमसीटी टर्मिनलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे औपचारिक पाठवले आहे. त्यामुळे न्हावा शेवा बंदरावर रो-रो सेवा सुरू करावी. या महत्त्वाच्या पायरीमुळे ऑटोमोबाईल उद्योगाला फायदा होईल, प्रादेशिक विकासाला गती मिळेल, असेही बारणे यांनी म्हटले आहे.
औद्योगिक दृष्टिकोनातून मुंबई बंदर प्राधिकरण (माझगाव) - तळेगाव एमआयडीसीपासून सुमारे 140 किमी, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) (न्हावा शेवा-जेएनपीटी) - तळेगाव एमआयडीसीपासून सुमारे 110 किमी अंतर आहे. न्हावा शेवा बंदर औद्योगिक क्षेत्राच्या जवळ आहे. तेथे चांगले महामार्ग कनेक्टिव्हिटी देखील आहे. यामुळे ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी अधिक योग्य आणि व्यावहारिक पर्याय होऊ शकतो.