

अलिबाग म्हटले की, डोळ्यासमोर येतात निळाशार समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, नारळ-सुपारीची झुलती झाडे आणि मुंबईपासून अवघ्या काही तासांवर मिळणारी निवांत विश्रांती. मात्र, या समुद्रकाठाच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाच्या कुशीत एक असेही ठिकाण आहे, जे गोंगाटापासून दूर, शांतता, निसर्गसौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम घडवते. वेश्वी-गोंधळपाडा ग्रामपंचायत क्षेत्रात वसलेला गोकुळेश्वर तलाव हे असेच एक दुर्लक्षित पण अत्यंत मनमोहक पर्यटनस्थळ आहे.
हा तलाव म्हणजे अलिबागच्या पर्यटन नकाशावरील एक शांत, हिरवेगार आणि आत्मिक विश्रांती देणारे ठिकाण. जो पर्यटक समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे जाऊन अलिबागचे खरे सौंदर्य अनुभवू इच्छितो, त्याने गोकुळेश्वर तलावाला भेट दिलीच पाहिजे.
अलिबाग शहरातून वेश्वीगोंधळपाडा दिशेने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवळ, छोट्या वाड्या-वस्त्या आणि स्थानिक जीवनाचे दर्शन घडते. शहराच्या गर्दीतून बाहेर पडताच वातावरण हळूहळू शांत होत जाते. काही मिनिटांच्या प्रवासानंतर समोर दिसतो तो विस्तीर्ण, स्वच्छ आणि निसर्गरम्य गोकुळेश्वर तलाव.
पहिल्याच नजरेत तलावाचे सौंदर्य मनाला भुरळ घालते. पाण्यावर उमटलेले आकाशाचे प्रतिबिंब, सभोवतालची झाडे, पक्ष्यांचा कलरव हे सगळे पाहून प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो. गोकुळेश्वर तलाव म्हणजे अलिबागच्या पर्यटनातला एक शांत, हिरवागार आणि आत्मिक अध्याय.
समुद्र, किल्ले आणि गर्दीच्या पलीकडे जाऊन जो पर्यटक अलिबागचा खरा, निवांत आणि निसर्गसंपन्न अनुभव घेऊ इच्छितो, त्याच्यासाठी गोकुळेश्वर तलाव हे एक परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे.इथे निसर्ग आहे,श्रद्धा आहे,संस्कृती आहे,आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शांतता आहे.
गोकुळेश्वर तलाव हा केवळ पाण्याचासाठा नसून तो एक पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र आहे. शहरातील नागरिकांसह पर्यटकांसाठीही हा तलाव एक विश्रांतीस्थळ बनला आहे. येथे येणारा पर्यटक गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवू शकतो. तलावाच्या काठावर फेरफटका मारण्यासाठी उत्तम पायवाट आहे. सकाळी आणि संध्याकाळी येथे मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकसाठी शेकडो नागरिक येतात. पर्यटकही या चालण्यात सहज सामील होऊ शकतात आणि स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घेऊ शकतात.
निसर्गप्रेमी आणि बर्ड वॉचर्ससाठी गोकुळेश्वर तलाव एक छोटेखानी स्वर्ग आहे. येथे विविध प्रजातींचे पक्षी दिसतात. सकाळच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या सुमारास पक्ष्यांची वर्दळ अधिक वाढते.
पर्यटक येथे बसून शांतपणे पक्ष्यांचे निरीक्षण करू शकतात. शहरातील गोंगाटापासून दूर, पक्ष्यांचा कलरव ऐकत वेळ घालवणे हा पर्यटनाचा एक वेगळाच आनंद देणारा अनुभव आहे.
संध्याकाळी गोकुळेश्वर तलावावर दिसणारा सूर्यास्त हा पर्यटनातील सर्वोत्तम क्षण मानला जातो. आकाशातील रंगछटा, पाण्यावर उमटणारे प्रतिबिंब आणि शांत वातावरण हे दृश्य छायाचित्रकारांसाठी पर्वणी असते.
पर्यटक येथे बसून सूर्यास्त पाहत दिवसाचा शेवट शांततेत घालवू शकतात.गोकुळेश्वर तलाव हे एक नाजूक पर्यावरणीय पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्गाचा आदर करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक पर्यटनामुळेच या ठिकाणाचे सौंदर्य टिकून राहू शकते.
गोकुळेश्वर तलावाच्या जवळच असलेली एज्युकेशन सोसायटी या परिसराला शैक्षणिक महत्त्व प्राप्त करून देते. अनेक विद्यार्थी आणि शिक्षक येथे अभ्यासासोबत निसर्गाचा अनुभव घेताना दिसतात.
पर्यटकांसाठीही हे ठिकाण शैक्षणिक पर्यटन म्हणून महत्त्वाचे ठरते. निसर्ग, पर्यावरण, जलसंधारण आणि जैवविविधता याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा परिसर उपयुक्त आहे.
गोकुळेश्वर तलावाचे पर्यटनदृष्ट्या सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे मुक्तपणे विहार करणारी दहा ते पंधरा ‘बदके’. ही बदके तलावाच्या पाण्यावर शांतपणे तरंगताना पाहणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो.
पर्यटक, विशेषतः कुटुंबासह आलेली मंडळी आणि लहान मुले, बदकांकडे आकर्षित होतात. कॅमेऱ्यात हे क्षण टिपले जातात. बदकांचे पाण्यातील खेळ, त्यांच्या हालचाली, पंखांची फडफड हे सगळे निसर्ग छायाचित्रणासाठी अत्यंत योग्य आहे.
आरोग्य पर्यटन
आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य आणि मानसिक शांतता यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोकुळेश्वर तलाव परिसरात उपलब्ध असलेली जिम आणि व्यायामाची व्यवस्था या ठिकाणाला आरोग्य पर्यटनाचा दर्जा देते. पर्यटक येथे सकाळी योग, प्राणायाम, चालणे किंवा हलका व्यायाम करू शकतात. निसर्गाच्या सान्निध्यात केलेला व्यायाम शरीर आणि मन दोन्हींना ताजेतवाने करतो.
गणेश विसर्जन घाट : सांस्कृतिक पर्यटन
गोकुळेश्वर तलावावरील गणेश विसर्जन घाट हा सांस्कृतिक पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहे. गणेशोत्सवाच्या काळात येथे होणारे विसर्जन, भक्तीमय वातावरण, पारंपरिक ढोल-ताशे हे दृश्य पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरते. हा काळ अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक मुद्दाम या परिसराला भेट देतात. स्थानिक परंपरा आणि संस्कृती जवळून पाहण्याची ही उत्तम संधी असते.
गोकुळेश्वर मंदिर : धार्मिक पर्यटन
गोकुळेश्वर तलावाजवळ असलेले गोकुळेश्वर मंदिर हे या पर्यटनस्थळाचे आध्यात्मिक केंद्र आहे. मंदिराचे शांत वातावरण, नियमित पूजा-अर्चा आणि भाविकांची श्रद्धा हे सगळे धार्मिक पर्यटनासाठी महत्त्वाचे ठरते. पर्यटक येथे दर्शन घेऊन मनःशांतीचा अनुभव घेतात. तलावाच्या पाण्यात उमटणारी मंदिराची सावली हे दृश्य विशेष आकर्षक आहे.