

खाडीपट्टा : दरवर्षी खाडीपट्टयात साजत्या होणाऱ्या जत्रांपैकी पहिला जत्रौत्सव म्हणून आवर्जून उल्लेख केला जातो तो, भवानी देवीचा जत्रौत्सव. भवानी नडगांव ग्रामस्थ मंडळ, कुणबी समाज मंडळ मुंबई, तरुण मित्र मंडळ, सुवर्णकार मंडळ, ग्रामस्थ महिला मंडळ व मुंबई महिला मंडळ यांच्यावतीने शनिवारी या जत्रौत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या जत्रौत्सवाची जय्यत तयारी सुरु असून विविध धार्मिक कार्यक्रमांसह शक्ती, तुरा तमाशाचा जंगी सामना देखील शेकडो उपस्थित कला रसिकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आल्याचे यजमान ग्रामस्थांनी सांगितले.
गावाकडचे जत्रौत्सव म्हटल्यावर सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरते. या जत्रेमध्ये खेळणी, हॉटेल, आईस्क्रीम, पाळणे, कटरली, स्वीट मार्ट सारखे विविध प्रकारची दुकाने व्यापारी थाटतील. जत्रा म्हटली की, शक्ती-तुरा तमाशा हा आलाच. यावेळी शक्तीवाले जननी देवी नृत्य कला पथक देवळे बंधू व सहकारी मुळकवी भानुदास परंपरेतील गुरुवर्य कै. विश्राम नाथ महाराजे यांचे शिष्य गुरुवर्य नथू, दत्ताराम यांचे शिष्य गुरुवर्य दत्ता देवळे, गंगाराम यांचे शिष्य दिलीप, रामचंद्र यांची मंडळी व सहकारी मु.जुई, ता. महाड तसेच तुरेवाले शंभुराजू घराण्यातील ब्रह्मनिष्ठ काशीराम कुंभार, यांचे शिष्य गुरुवर्य गोविंद नामदेव, महादेव पांडुरंग यांचे शिष्य कविवर्य धोंडू दिनकर बुवा यांचे पट्ट शिष्य शाहीर सुरेश, विलास, एकनाथासह सुरेश बुवा यांचे शिष्य शाहीर दिनू नरेशा आणि मंडळी मु. चिंचाळी, ता. मंडणगड या दोन्ही नामवंत गाजलेल्या कलावंतांमध्ये सामना रंगणार आहे.
जत्रौत्सवाच्या कार्यक्रमामध्ये होम हवन व पूजा, भजन, हरिपाठ, दिंडी, भवानी देवीच्या पालखीची मिरवणूक, देवीची आरती, मान्यवरांचा सत्कार, शक्ती-तुरा तमाशाचा जंगी सामना यावेळी आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी गावातील माहेरवाशीनी तसेच पाहुणेमंडळी यांच्यासह खाडीपट्टयातील शेकडो नागरिक जत्रोत्सवामध्ये गर्दी करतील.
श्री भवानी देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी झालेली पाहायला मिळते. मनोरंजनाचे कार्यक्रम, बच्चेकंपनीची धमाल, माहेरवाशीणींचे येणे, मंदिरात ग्रामदेवीचे मनोभावे दर्शन, पूजा, ग्रामदेवीचा सोहळा, दुकानांमधून वस्तूंची व खाद्यपदार्थांची खरेदी, तमाशा हौशिंसाठी तर लोकनाट्य तमाशाचे रात्रभर मनोरंजन अशा अनेक गोष्टींसाठी जत्रांना महत्त्व आहे.