

माथेरान : माथेरानच्या विकासासाठी समन्वयातून काम करुन जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल,अशी ग्वाही,नूतन नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी दिली आहे.
माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर एकूण पंधरा जागांवर नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी हे भरघोस मतांनी विजयी झाले होते.मंगळवारी (30 डिसेंबर) रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्यासह युतीच्या विजयी नगरसेवकांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.यावेळी ते बोलत होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात झालेल्या पदभार स्वीकार समारंभात मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला.
यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला.मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नगरपरिषदेत तरुण नेतृत्वासह अनुभवी नगरसेवक निवडून आल्याने समन्वयाने काम करणे अधिक सुलभ होणार आहे.
माथेरान शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत प्रशासन म्हणून नगरपरिषद नेहमीच सहकार्य करेल असे त्यांनी स्पष्ट केले.या समारंभावेळी शिवसेना भाजप युतीचे असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
नागरिकांनी दिलेल्या विश्वासाचे चीज करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून शहराच्या विकासासाठी काम करू.नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू.गावाच्या विकासासाठी विरोधकांना सोबत घेऊन या गावाचा सर्वांगीण विकास करू असे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी स्पष्ट केले.