तुतीची लागवड आणि संगोपन | पुढारी

तुतीची लागवड आणि संगोपन

सत्यजित दुर्वेकर

तुतीची लागवड किंवा रेशमी किड्यांचे पालन केल्यास त्यामुळे शेतकर्‍यांना चांगला फायदा होऊ शकतो; पण हे करताना काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. रेशमी किड्यांचे योग्य संगोपन करण्यासाठी काही बाबी पाळणे आवश्यक आहे. या पिकामुळे शेतकर्‍याला चांगला फायदाही होऊ शकतो.

गेल्या काही वर्षांत आपल्याकडे अनेक शेतकरी अत्याधुनिक पिके घेऊ लागले आहेत. तुतीची लागवड किंवा रेशमी किड्यांचे पालन हेही यापैकीच एक आहे. संगोपनाच्या संपूर्ण काळात रेशमी किड्यांकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. तुतीच्या चांगल्या प्रकारच्या पानांवर त्यांचे पोषण करावे लागते. तुतीच्या दोन प्रमुख जाती आहेत. त्यामध्ये व्ही-1 आणि एस-36 या दोन जातींचा प्रामुख्याने समावेश होतो. या पिकांना 70 ते 80 दिवस लागतात. वर उल्लेख केलेल्या दोन जाती तुतीच्या उच्च पीक देणार्‍या, रेशमाच्या लार्व्हाच्या पोषणाकरिता आवश्यक असलेल्या पानांचे उत्पादन करतात. एस-36 या जातीच्या तुतीची पाने हृदयाच्या आकाराची असतात. त्याचप्रमाणे जाड, चकाकणारी आणि सौम्य हिरव्या रंगाची असतात. एका वर्षात एक एकर जमिनीतून सुमारे 15 हजार ते 16 हजार किलोग्रॅम तुतीच्या पानांचे पीक घेतले जाऊ शकते. व्ही-1 ही जात 1997 मध्ये प्रस्तुत करण्यात आली. या जातीची पाने अंडाकृती असतात. त्याचप्रमाणे ती रुंद आकाराची, जाड, रसाळ आणि गर्द हिरव्या रंगाची असतात. या जातीचे जास्त उत्पन्‍न घेता येते, असा अनुभव आहे. यामधून 20 हजार ते 24 हजार किलोग्रॅम पानांचे उत्पन्‍न घेतले जाऊ शकते.

या जातींची लागवड वेगळ्या पद्धतीने करावी, असे तज्ज्ञ सांगतात. 90 बाय 90 किंवा 60 बाय 60 अंतर ठेवून लागवड करण्यापेक्षा 90 बाय 150 किंवा 60 बाय 60 अंतराने लागवड करणे जास्त हितकारक ठरते, असे सांगितले जाते. यामुळे प्रत्येक रांगेत जास्त रोपे लावली जाऊ शकतात. या पद्धतीने लावलेल्या रोपांचे अंकुरण जलद होते आणि त्यामुळे आपल्या श्रमातही बचत होते. यासाठी शेणखताचा वापर करता येईल. हे करतानाच याच्या पाणीपुरवठ्याचीही माहिती घेतली पाहिजे. आठवड्यातून एकदा 80 ते 120 मि. मि. प्रमाणात पाण्याचे सिंचन करावे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकेल.

रेशमाचा किडा पाच वेगवेगळ्या चरणांतून जातो. जे किडे दुसर्‍या चरणात असतात त्यांना लहान वयाचे किडे किंवा चौकी असे म्हणतात. ते अतिशय संवेदनशील असल्याने त्यांच्या संगोपनासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते. त्यामुळेच वेगवेगळ्या संगोपन केंद्रातून नियंत्रित परिस्थितीमध्ये जोपासलेले रेशमाचे किडे घेण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्या झालेल्या किड्यांचे पालन किंवा संगोपन तिसर्‍या चरणापासून सुरू होते. हे किडे फार अधाशी असतात. तुतीवरील रेशमाच्या किड्यांचे संगोपन हे घरगुती असल्यामुळे याला विशिष्ट पद्धतीचे पर्यावरणीय तापमान लागते. पानांचे संरक्षण, चौकीचे संगोपन, मोठ्या किड्यांची जोपासना या सगळ्यासाठी पुरेशा जागेची आवश्यकता असते. मोठ्या वयाचे रेशमाचे किडे उच्च तापमान, उच्च आर्द्रता, खराब वायुवीजन सहन करू शकत नाहीत. म्हणून संगोपन गृहांमध्ये जागेचेे तापमान खाली आणण्यासाठी आणि रेशमाच्या किड्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेल्या विष्ठेची वाफ आणि गॅसेस बाहेर काढण्यासाठी खेळती हवा ठेवणे आवश्यक आहे. संगोपन गृह आणि उपकरणांचे निर्जंतुकीकरण जोपासनेच्या आधी दोनदा केले पाहिजे. रेशमाच्या किड्यांच्या जोपासनेच्या या पद्धतीत संगोपनाचे तीन अंतिम चरण वेगवेगळी पाने देण्याऐवजी तुतीचे अंकुर देऊन पार पाडले जातील. संगोपनाची ही पद्धत फार कमी खर्चाची आहे. रेशमाच्या किड्यांना कमी प्रमाणात हात लागल्याने संक्रमण आणि रोग पसरणे यामध्ये कमतरता येते. रेशमाचे किडे आणि पाने यांना घाणीपासून वेगळे केल्यामुळे दुय्यम संक्रमणाचे प्रमाण कमी होते. या अळ्यांचे पोषणही उत्तमप्रकारे करावे लागते. ज्यांना 3 ते 4 फुटांच्या उंचीवर ठेवण्यात आले आहे, अशा अळ्यांना आहार देणे सुरू करावे. अंकुरीत कोंबांना थंड आणि ओलसर जागेमध्ये, सैलसर उभ्या अवस्थेत एका निर्जंतुक गनी कापडाने झाकून ठेवावे. या अळ्यांना रोज सकाळी 6 वाजता, दुपारी 2 वाजता आणि रात्री दहा वाजता असा तीन वेळा आहार द्यावा. माती लागलेल्या आणि पिकलेल्या पानांचा आहार मात्र देण्याचे टाळावे. प्रत्येक आहाराच्या वेळी लार्व्हांना बेडवर एकसारखे पसरून ठेवावे. प्रदूषणापासून बचाव करण्याचीही काळजी घ्यावी लागते. प्रत्येक वेळी स्वच्छता करताना किंवा आहार देताना चॉपस्टिकच्या मदतीने लहान आकाराच्या आणि रोगाची शक्यता असणार्‍या किड्यांना बाहेर काढावे. याचबरोबर ब्लिचिंग पावडरचा उपयोगही करता येईल. संगोपनगृहात प्रवेश करण्याआधी हातपाय निर्जंतुकीकरण सोल्युशनने धुवावेत.

Back to top button