रायगड :  लाटवण-दापोली मार्गावरील पुलावर पुराचे पाणी; वाहतूक विस्कळीत | पुढारी

रायगड :  लाटवण-दापोली मार्गावरील पुलावर पुराचे पाणी; वाहतूक विस्कळीत

विन्हेरे; विराज पाटील : महाड पोलादपूर परिसरात मागील २४ तासांपासून संततधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. दापोली भागाला जोडणाऱ्या विन्हेरे रेवतळे लाटवण मार्गावरील पुलावर पुराचे पाणी आल्याने परिसरातील वाहतूक ठप्प  झाली असून महाडचा संपर्क तुटला आहे.

रविवारी दुपारपासूनच परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे रेवतळे गावाजवळील मुख्य मार्गावरील पुलावरून पहाटेपासून पाणी वाहू लागल्यामुळे स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या पुलावरील वाहतूक बंद केली आहे, अशी माहिती रेवतळे येथील सरपंच किशोर शेठ यांनी दिली.

गेल्या वर्षी  एसटी चालकाने भर पावसातून पुराच्या पाण्यातून गाडी नेण्याचा प्रकार केला होता, याची आठवण ठेवून ग्रामस्थ तसेच स्थानिक प्रशासनाने याबाबत आधीच खबरदारी घेतली आहे. तसेच प्रवाशांना सुरक्षितस्थळी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मागील जवळपास दोन ते तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. आता गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेला पाऊस रविवारपासून मुसळधार कोसळत आहे. महाड पोलादपूर परिसरात मात्र पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावून गेल्याचे सुखद चित्र पाहावयास मिळत आहे.

पुलावरून पाणी वाहू लागले असून पुलाच्या दोन्ही बाजूने मात्र अनेक वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाचा पुढील आदेश येत नाही आणि पुलावरून पाणी जोपर्यंत ओसरत नाही, तोपर्यंत वाहतूक सुरू करण्याबाबत कोणतेही निर्देश अथवा परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती  स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  हेही वाचलंत का? 

Back to top button