नगर : यंदाच्या खरिपावर अतिवृष्टीचे सावट | पुढारी

नगर : यंदाच्या खरिपावर अतिवृष्टीचे सावट

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने खरीप लांबला होता. मात्र, त्यानंतर पावसाने धरण पाणलोटासह लाभक्षेत्रात लावलेल्या हजेरीमुळे यावर्षी तब्बल 6 लाख हेक्टरवर खरीप पेरण्या झाल्या आहेत. दरम्यान, मूग आणि बाजरीत घट झाली असून, उर्वरित खरिपाच्या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यात कपाशीची तब्बल 1 लाख 25 हजार हेक्टरवर विक्रमी लागवड झाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून अनेक भागात दमदार पाऊस सुरू आहे. काही भागात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. त्यामुळे कपाशी, सोयाबीनचे शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्यात असल्याचेही भीषण वास्तव आहे.

जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरीप हंगामासाठी सरासरी 5 लाख 79 हजार हेक्टर क्षेत्र गृहीत धरले होते. प्रत्यक्षात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने खरिपाचा टक्का वाढला आहे. यावर्षी 5 लाख 92 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये अकोले तालुक्यात प्रस्तावित 17 हजार 276 हेक्टरवरील भात लागवड ही प्रत्यक्षात 9 हजार हेक्टरवर झालेली आहे. बाजरीचे 84 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असताना प्रत्यक्षात 40 हजार हेक्टरवर बाजरी घेतली आहे. सोयाबीन 87 हजार 330 हेक्टर प्रस्तावित असतांना प्रत्यक्षात 1 लाख 40 हजार हेक्टरवर 160 टक्के पेरणी झाली आहे. तर, कपाशीची 1 लाख 25 हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

वरूणराजाच्या विश्रांतीकडे नजरा!

गेल्या आठवडाभरापासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. अनेक भागात दररोज पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, कपाशीमधून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकर्‍यांची दमछाक झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिला, तर पिके हातातून जाण्याची भिती आहे. दुसरीकडे कडधान्यांची काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे पावसाच्या विश्रांतीची गरज आहे.

खरीप पिकांची हेक्टरी आकडेवारी
  • सोयाबीन : 1 लाख 41 हजार
  • कापूस : 1 लाख 25 हजार
  • भात : 9 हजार 151
  • बाजारी : 84 हजार 805
  • मका : 65 हजार 355
  • तूर : 49 हजार 675
  • मूग : 41 हजार 261
  • उडिद : 62 हजार 742
  • भूईमूग : 4 हजार 682
  • तीळ : 78 हजार हेक्टर

Back to top button