Raigad Fort : सलग दुसऱ्या वर्षी रायगडावरील हत्ती तलाव तुडूंब भरला | पुढारी

Raigad Fort : सलग दुसऱ्या वर्षी रायगडावरील हत्ती तलाव तुडूंब भरला

रायगड; पुढारी वृत्तसेवा : रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून किल्ले रायगड (Raigad Fort) तसेच परिसरात विकासात्मक कामे सुरू आहेत. हत्ती तलावाचे काम पूर्ण करण्यात आले असून हत्ती तलाव सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शिवभक्त आणि गडप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.

दुर्गराज रायगडवरील (Raigad Fort) हत्ती तलाव यावर्षी पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरला आहे. मागील दोन – तीन वर्षांपासून रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हत्ती तलावाची गळती काढण्याचे काम सुरू होते. यामुळे २०२० साली हत्ती तलाव दीडशे वर्षांत पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, तलावाच्या ऐतिहासिक बांधकामास कोणतीही इजा पोहोचू न देता काम करत असताना काही तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. नंतरच्या काळात या त्रुटी देखील शात्रोक्त पद्धतीने दूर करण्यात आले. याचा परिणाम म्हणून यावर्षी पहिल्या पावसातच हत्ती तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सध्यातरी कोणतीही गळती अथवा त्रुटी राहिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तलावातील पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. तथापि, रायगड विकास प्राधिकरणाच्या तज्ज्ञांची टीम या कामावर लक्ष ठेवून आहे.

तसेच, गडावर मुसळधार पाऊस पडत असून गड चढाईच्या मार्गावर पाण्याचे तीव्र प्रवाह यासह दरडी कोसळत असतात. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शिवभक्तांनी पावसाळ्याच्या दिवसांत रायगड चढणे टाळावे, असे आवाहन रायगड प्राधिकरणाच्या वतीने शिवभक्तांना करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button