राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'एनडीआरएफ'च्या १५ तुकड्या तैनात | पुढारी

राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा; 'एनडीआरएफ'च्या १५ तुकड्या तैनात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात २ एनडीआरएफची टीम तैनात

कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १००.१ मिमी. पाऊस झाला आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९३.९ मिमी. पाऊस झाला आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत उल्हास नदीची पातळी १२.९० मीटर एवढी होती. तर नदीची इशारा पातळी १६.५० मोटर तर धोका पातळी १७.५० मीटर एवढी आहे. जिल्हात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यात २ एनडीआरएफची टीम तैनात केल्या आहेत.

मुंबईत मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरु

मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ८४ मिमी तर सांताक्रूझ येथे १९३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी सबवे टिळकनगर टर्मिनस, टेम्बी ब्रिज परिसर तसेच शेख मेस्त्री दर्गा कुर्ला, दादर टीटी याठिकाणी पाणी साचले आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत महापालिका नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबईमध्ये एनडीआरएफच्या ३ टीम या आधीच तैनात आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून २ अतिरिक्त टीम अशा एकूण ५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

रायगडमध्ये १७१६ जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३५ मिमी. पाऊस झाला आहे सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत असून कशेडी घाट मार्गातील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील ५७८ कुटुंब म्हणजे एकूण १७१६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच ३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात २ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५४.८९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरड प्रवण व पूर प्रवण भागातील १५२ कुटुंब म्हणजे एकूण ४७९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ घरे जमीनदोस्त झाली असून ६७ घरांचे अंशतः नुकसान झाले असून एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. तसेच जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः तर १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही. तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थिती मध्ये पूर परिस्थिती नाही. मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासात ७ फुटांनी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी २१.६ फूट असून इशारा पातळी ३९ फूट एवढी आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने झालेली वाढ आणि पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नदी काठावरील लोकांना सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून स्थानिक शोध व बचाव पथके तैनात करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील २१०२ जणांना निवारा केंद्रांमध्ये हलविले

अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. तरी खबरदारीचा उपाय म्हणून गावातील २१०२ लोकांना जिल्यातील ७ निवारा केंद्रात हलविण्यात आहे. अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक शोध व बचाव पथके कार्यरत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

मुंबई (कांजूरमार्ग १ घाटकोपर १) – २, पालघर -१,रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ९ तुकड्या

मुंबई -३, पुणे-१, नागपूर-१ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button