रायगड, पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यातील गड कोट आपला ऐतिहासिक वारसा आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या सर्व गड कोटांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी अमृत महोत्सव आणि जागतिक वारसा दिनाचेवेळी सोमवारी (दि.18) किल्ले रायगडवर केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून भारतीय पुरातत्व विभागाने रायगडवर नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. यावेळी सोमवार (दि.18) सायंकाळी किल्ले रायगडवर वसंत कानेटकर यांनी 'रायगडला जेव्हा जाग येते' या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते.
आज चारशे वर्षांनंतरही ज्यांची जयंती, राज्याभिषेक आणि पुण्यतिथी साजरी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा जगाच्या पाठीवर दुसरा राजा नाही. तसेच अशा महान राजाच्या कर्मभूमीत आपला जन्म झाला आहे हे आमचे भाग्य आहे, असे असे ना. तटकरे म्हणाल्या. यानंतर नंदिनी भट्टाचार्य यांनी जागतिक वारसादिनाच्या निमित्ताने प्रत्येक वारसा आमच्यासाठी अमुल्य ठेवा असल्याचे सांगितले. तर डॉ. राजेंद्र यादव यांनी किल्ले रायगडावर करण्यात येत असलेल्या संवर्धन कामांची माहिती दिली. शेवटी 'रायगडाला जेव्हा जाग येते` या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. यावेळी या नाट्यप्रयोगाचा अनुभव घेण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, या कार्यक्रमाला भारतीय पुरातत्व विभागाच्या संचालक नंदिनी भट्टाचार्य, मुंबई विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र यादव,महाडच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, माणगांवच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रशाली दिघावकर, महाडचे तहसिलदार सुरेश काशिद 'रायगडाला जेव्हा जाग येते` या नाटकाचे दिग्दर्शक उपेंद्र दाते, अभिनेते प्रमोद पवार उपस्थित होते.
हेही वाचा