

महेंद्र कांबळे
पुणे : हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि दिल्ली येथील सराईत गुन्हेगारी टोळ्यांनी एकमेकांविरोधात रक्तचरित्र रेखाटण्यास सुरुवात करण्याबरोबरच थेट सोशल मीडियावरून एकमेकांचा काटा काढण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार समोर आले होते. त्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांनी सोशल मीडियावर आपला दबदबा कायम ठेवून अशा स्वरूपाची गुन्हेगारी कृत्ये हाणून पाडत शेकडो गुंडांना कारागृहाची हवा खाण्यासाठी पाठविले आहे.
सोशल मीडियातून होणारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणार्यांविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी ठोस पावले उचलून गुन्हेगारी मोडीत काढली आहे. पुण्यातील एका गुंडाने काढलेली मिरवणूक महाराष्ट्र पोलिसांच्या डोळ्यावर आली होती. अशा गुन्हेगारीचे उदात्तीकरण रोखण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईच्या दृष्टीने पावले उचलली. मोक्का, एमपीडीए, तडीपारी कारवाई या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करून 500 हून अधिक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. पुणे पोलिसांनी मागील दीड वर्षात 85 टोळ्यांवर 'मोक्का'अंतर्गत कारवाई करून पुण्यातील गुन्हेगारीचे अक्षरश: कंबरडे मोडले.
एखाद्या गुन्हेगाराने किंवा तरुणाने अशा प्रकारे खुलेआम गँगवॉरची धमकी देणे तर सोडाच, तर साधा तलवारीचा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला, तरी पोलिस त्याची उचलबांगडी करून 'आफ्टर-बिफोर'चा दणका त्यांना दिला जातो. गेल्या वर्षभरात महाराष्ट्र पोलिसांनी नव्याने उदयास येणार्या भाई आणि त्यांच्या टोळ्यांचा बंदोबस्त केला. परिणामी, सोशल मीडियावरून देखील गुन्हेगार गायब झाल्याचे दिसून आले. गुन्हेगारी जगतात गँगस्टरची लाईफ आकर्षण म्हणून तरुण पिढी पाहते.
त्यांना फॉलो करते. कालांतराने त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करते. मात्र, वास्तव काहीसे वेगळेच असते. गुन्हेगारी फोफावणार्या या राज्याचा महाराष्ट्राच्या तुलनेत विचार केला, तर परिस्थिती वेगळीच दिसते. महाराष्ट्रात सोशल मीडियावर गुन्हेगारांचा नव्हे, तर पोलिसांचा दबदबा वाढताना दिसतो. विशेष म्हणजे, महाराष्ट्र पोलिसांनी 90 च्या दशकात एन्काउंटरच्या माध्यमातून सराईत टोळ्यांचा बंदोबस्त केला. त्याचबरोबर आधुनिकतेची कास धरत समाजमाध्यमांवर देखील करडी नजर ठेवली आहे.
उत्तर भारतीय टोळ्यांचा ट्रेंड
सिद्धू मुसेवाला हत्येनंतर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुकवर मुसेवालाचा खून केल्याची जबाबदारी घेतली. आमच्या टोळीतील एका व्यक्तीच्या खून प्रकरणात मुसेवाला याने मदत केल्याचे सांगून त्यांनी हा खून केला. येथील टोळ्यांनी समाजमाध्यमातून गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण केला. एखाद्या व्यक्तीकडून खंडणी वसूल करायची असो, की त्याचा खून करायचा असो, याबाबतच्या धमक्या येथील गुंड थेट समाजमाध्यमांवर देत आहेत.
समाजमाध्यमांवर ज्याचा दबदबा जास्त त्याची गुन्हेगारी जगतात किंमत अधिक, असेच काहीसे सूत्र या राज्यांमध्ये झाले आहे. मुसेवालाच्या खुनाची जबाबदारी सोशल मीडियावरूनच बिष्णोई गँगने घेतल्यानंतर त्याच्याविरोधातील तब्बल सहा गँगस्टरनी सोशल मीडियावरच बिष्णोईविरुध्द ऐलान केले. एवढेच नाही, तर मुसेवालाच्या मारेकर्यांची माहिती देणार्यांना थेट बक्षीसही जाहीर करून टाकले होते.
शस्त्रतस्करीवर पोलिसांचा वॉच
मुसेवाला याची हत्या करण्यासाठी बिष्णोई गँगने एके 47 रायफल, अत्याधुनिक पिस्तुले, हँड ग्रेनेट, रॉकेटलाँचर अशा घातक शस्त्रांचा साठा केला होता. ही सर्व शस्त्रे घेऊन मारेकरी बिनबोभाट मुसेवाला राहत असलेल्या परिसरात घेऊन फिरत होते. ही खरेतर तेथील पोलिसांच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे. त्याउलट परिस्थिती महाराष्ट्रात असल्याचे दिसते.
शेजारील मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात राज्यात जरी शस्त्रतस्करी होत असली, त्या तस्करीला आळा घालण्यात महाराष्ट्र पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे. नुकतेच पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करीत कित्येक पिस्तुले आरोपींकडून जप्त केली. बेकायदा पिस्तुले असल्याचा सुगावा लागताच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात.
कारागृहातूनच होतो 'गेम सेट'
इतर राज्यांत पोलिस सुरक्षेत असलेल्या गुन्हेगारांचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून केला जातोय. कारागृहे खुनाचा आखाडा बनू पाहत आहेत. येथील राज्यातील पोलिस दलांच्या या टोळ्यांनी नाकीनऊ आणले आहेत. कारागृहात बसून प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांचा गेम सेट केला जातोय. त्यानंतर सोशल मीडियावर फोटो अपलोड करून आमच्याच टोळीने त्याचा गेम केल्याचे छातीठोकपणे सांगितले जातेय.
हेही वाचा