सातारा : शिंगणापूर-म्हसवड मार्गावर बसचा दुष्काळ | पुढारी

सातारा : शिंगणापूर-म्हसवड मार्गावर बसचा दुष्काळ

शिखर शिंगणापूर : पुढारी वृत्तसेवा

माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर व म्हसवड या महत्त्वाच्या दोन तिर्थक्षेत्रांना जोडणार्‍या मार्गावर एसटीचा दुष्काळ जाणवत आहे. या मार्गावरील प्रवाशी सेवेबाबत दहिवडी आगार उदासीन असून विद्यार्थी व प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. केवळ एस.टी. सुविधेअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला खो बसत आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूर व म्हसवड येथे मोठी बसस्थानके असून, दहिवडी आगाराअंतर्गत येथील कामकाज चालते. मराठवाड्यासह अहमदनगर, करमाळा, अकलूज, इंदापूर, बारामती या भागांतून शिंगणापूर व म्हसवड देवस्थानच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र, 30 किलोमीटर अंतराच्या शिंगणापूर-म्हसवड मार्गावर दिवसभरात आटपाडी व सांगोला आगाराच्या केवळ दोनच बसच्या फेर्‍या आहेत. विशेष म्हणजे दहिवडी आगाराची या मार्गावर एकही बस नसल्याने विद्यार्थ्यांसह
प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

दहिवडी आगाराने यापूर्वी सुरु असलेल्या म्हसवड-शिंगणापूर शटलसेवा तसेच म्हसवड- शिंगणापूर मुक्कामी बस या दोन्ही फेर्‍या बंद केल्यामुळे वरकुटे, रांजणी, मार्डी, मोही, शिंगणापूर या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत. या मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना एस.टी.साठी तीन ते चार तास ताटकळत बसावे लागत आहे. तर, शिंगणापूर, मोही, मार्डी व म्हसवड येथे शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे दहिवडी आगाराने म्हसवड-शिंगणापूर मार्गावरील पूर्वी सुरू असणार्‍या बसफेर्‍या नियमितपणे सुरू करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

शिक्षणासाठी मुलींची सायकलवारी

शिंगणापूर, ठोंबरेवाडी येथून मोही येथे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जात आहेत. मात्र, या मार्गावर शालेय वेळेत बसेसची सोय नसल्यामुळे विद्यार्थिनी सायकलवरून येजा करून शिक्षण घेत आहेत. तर, अनेक विद्यार्थ्यांना शाळेसाठी 5 ते 10 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी शासन विविध सोयीसुविधा देत असताना केवळ एस.टी. नसल्याने शिंगणापूर परिसरातील मुलींच्या शिक्षणाला ब्रेक लागत आहे.

Back to top button