नेवाळी : शेतकर्‍यांकडून भातपेरण्या पूर्ण | पुढारी

नेवाळी : शेतकर्‍यांकडून भातपेरण्या पूर्ण

नेवाळी : पुढारी वृत्तसेवा मातीचा चेंडू होत आहे काय याची शहानिशा करण्यापूर्वीच यंदा मोसमी पाऊस आला असे समजून सिंचनाची सोय असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील आणि कल्याण ग्रामीण भागातील 5 हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी भात पिकाची पेरणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील काही भागात पिकेही अंकुरली असून अंकुरलेले पीक जगविण्यासाठी शेतकरी सध्या जीवाचा आटापिटा करीत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जात असते. मात्र दिवसेंदिवस पावसाचे दिवस लांबत असल्याने असल्याने शेतकर्‍यांनी पेरण्याची कामे उरकून घेतली आहेत. अनेक ठिकाणी शेतात मातीचे चेंडू निर्माण होतील अशी माती ओलीचिंब झालेली आहे. त्यातच पाऊस तीव्र पाडण्याचे संकेत येतात मात्र प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतकरीदेखील हवालदिल झालेला दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात भात पिकांची पेरणी पूर्ण झालेली दिसून येत आहे. मात्र दुबार पेरणीच संकट तर येणार नाही ना असा प्रश्न सध्या शेतकर्‍यांसमोर पडलेला आहे. पेरणी करायची असेल तर किमान 100 मिमी पाऊस झाला पाहिजे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जाते; पण आपल्या शेतात पेरणीयोग्य पाऊस झाला काय याची शहानिशा शेतकरी अगदी साध्या पद्धतीने करू शकतात. त्याला मातीचा चेंडू झेला फॉर्म्युला म्हणतात. गाव परिसरात पावसाच्या सरी झाल्यावर पेरणीसाठी जमीन तयार आहे काय? याची शहानिशा करण्यासाठी शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतातील माती उचलून त्याचा लाडूप्रमाणे गोळा (चेंडू) करावा. शिवाय हा मातीचा चेंडू फेकावा आणि झेलावा. झेललेला मातीचा चेंडू कायम राहिला तर बरा नाही तर पुन्हा दुबार पेरणी करण्याचे संकेत शेतकर्‍यांसमोर उभे ठाकणार आहे.

ग्रामीण भागात शेतकर्‍यांनी पेरणी केली असली तरी प्रत्यक्षात पिकांसाठी योग्य पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तर कृषी विभागाकडून देखील शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन केलं जात नसल्याने शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button