सातारा : ठाकरे गटाच्या ‘अपात्र’ यादीत आ. महेश शिंदे | पुढारी

सातारा : ठाकरे गटाच्या ‘अपात्र’ यादीत आ. महेश शिंदे

सातारा : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेत भूकंप करून गुवाहाटी येथे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बंडाचे निशान फडकवलेल्या 12 आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असून या यादीत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे याबाबत आता कशा घडामोडी घडणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण देत पक्षाच्या 12 आमदारांवर कारवाईची मागणी शिवसेनेकडून गटनेते अजय चौधरी, पक्षप्रतोद सुनील प्रभू, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, राजन साळवी यांच्यावतीने विधानसभेचे उपसभापती नरहरी झरवळ यांना करण्यात आली आहे. त्या आमदारांना अपात्र घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या 12 आमदारांंमध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचा समावेश आहे. आ. महेश शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे विश्‍वसनीय सहकारी आहेत. एकनाथ शिंदे यांनी आ. महेश शिंदे यांना विविध विकासकामांसाठी भरीव निधीही दिला आहे. त्यांच्या माध्यमातून आ. शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदार संघात कोट्यवधीची विकासकामे मार्गी लावली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडात ते म्होरके ठरल्यानंतर मतदार संघातील जनतेने आ. महेश शिंदे यांच्या भूमिकेचे स्वागतही केले आहे. आता आमदार अपात्र ठरवण्याच्या यादीत ठाकरे गटाकडून त्यांचे नाव आल्यामुळे पुढील घडामोडींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अपात्र ठरवण्याच्या यादीत एकनाथ शिंदे, आ. महेश शिंदे यांच्यासह तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर,लता सोनावणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.

Back to top button