

पुणे : पुढारी वृत्तसेवा
'किरीट सोमय्यांनी ज्या एजन्सीकडे माझ्या तक्रारी केल्या आहेत, त्या एजन्सीकडून मला प्रश्न विचारले गेल्यास मी उत्तर देईल. किरीट सोमय्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही,' असे परिवहनमंंत्री अॅड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. एसटी महामंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या वेळी सोमय्यांबाबत त्यांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. अॅड. अनिल परब म्हणाले, 'माझा व्यवहार अत्यंत पारदर्शक आहे. याबाबत मी संबंधित एजन्सीला उत्तरे दिली आहेत. परंतु, पुन्हा एकदा शिळ्या कढीला ऊत आणून बदनामी करणे, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांना उत्तर देणार नाही. आम्ही एजन्सीला उत्तर देऊ. एजन्सी चौकशी करतील आणि यातून सत्य बाहेर येईल.'
राज्यसभा निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, 'प्रत्येक जण आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो. निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येतील,' असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
'राज्यातील सर्व एसटी स्थानकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही ही सर्व स्थानके अद्ययावत करणार आहोत. यात प्रवाशांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह, वेटिंग रूम यांसारख्या विविध सुविधा असतील,' असे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितले. एसटी महामंडळाचा बालगंधर्व येथील अमृतमहोत्सव पदार्पण कार्यक्रम पार पडल्यानंतर परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मळाल्यावर लगेचच आम्ही सर्व एसटी स्थानके बीओटी तत्त्वावर अद्ययावत करू.'
एसटी संप काळात पीएमपीने शहराच्या ग्रामीण हद्दीत बससेवा सुरू केली आहे. यामुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. याबाबत अॅड. परब यांना विचारले असता, त्यांनी पीएमपीला ग्रामीण भागातील सेवा बंद करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. मात्र, या गाड्या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील, असेही ते या वेळी म्हणाले.