शिंदेवाडी येथे गोमांस पकडले

शिंदेवाडी येथे गोमांस पकडले

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा: गाई व बैलांची कत्तल करून गोमांस पिकअपमध्ये भरून पुण्यातील कोंढव्यात विक्रीसाठी नेत असताना पुणे- सातारा महामार्गावर शिंदेवाडी येथे मानव पशुकल्याण पथकाने पकडले आहे. 6 लाख 30 हजार किमतीचे साडेतीन हजार किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे. अजिम पीरअहमद शेख (वय 26, रा. महंमदवाडी हडपसर), अश्रफ शौकत खान (वय 24, कोंढवा), क्लीनर करीम अब्दुल रशीद बांगी (वय 37, रा. भवानीपेठ, पुणे) अशी गोमांस विक्रीसाठी घेऊन निघालेल्या आरोपींची नावे आहेत.

शुक्रवारी(दि. 24) रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मानव पशुकल्याण पथक तसेच राजगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक निखिल मगदूम, एस. बी. चव्हाण यांच्या संयुक्त मदतीने शिंदेवाडी ( ता. भोर ) गावात जुन्या पुणे ते सातारा महामार्गावर पुण्याकडे जात असताना टाटा शोरूमसमोर कारवाई करण्यात आली. यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी की, मानव पशुकल्याणचे शिवशंकर स्वामी यांना महामार्गावरून गोमांसची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच त्यांचे सहकारी आकाश थोरात, श्रेयश शिंदे, सचिन जवळगे यांच्यासह खेडशिवापूर टोल नाक्यावर पहाटे पाच वाजता दाखल झाले होते.

साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे पिकअप (एम.एच 14 एचडी. 3052), आणि (एम.एच. 12 टी. जी. 6974) जात असताना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहने न थांबता पुण्याकडे निघून गेले. यावेळी स्वामी यांनी पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून शिंदेवाडी येथे ही वाहने पकडली. वाहनाची तपासणी केली असता गोमांस आढळून आले. शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.उपनिरीक्षक एस.बी. चव्हाण करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news