जामखेडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू | पुढारी

जामखेडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले आहे. तीन आठवड्यांपासून शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. परंतु, पेरणीयोग्य पाऊस असेल तरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

तालुक्यात सुरुवातीपासूनच मान्सूनने हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतेत होते. परंतु, गुरुवारी (दि.23) रात्री पावसाने तालुक्यात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. यावर्षी उशिरा पेरण्या होत असल्याने तूर, मका, उडीद आदी पिकांकडे शेतकर्‍यांचा ओढा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजून पावसाची वाट पाहण्यापेक्षा शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत.

शेतकर्‍यांनी कृषी केंद्रांकडे धाव घेत बी-बियाणे खरेदीसाठी गर्दी केली आहे. पेरण्या उरकण्यात शेतकरी मग्न असल्याचे चित्र आहे. उशिरा पावसामुळे उडीद, मूगाच्या उत्पादनात घट होईल, म्हणून शेतकरी मका, तूर आदी पिकांची निवड करीत आहेत. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून, झालेल्या पावसावरच पेरणी करताना दिसत आहे.

सहा ठिकाणीच पर्जन्यामापक केंद्र

तालुक्यात 6 ठिकाणी पर्जन्य मापक केंद्र आहेत. त्या गावात पाऊस झाला तर त्याची नोंद होत आहे. त्यामुळे पर्जन्यमापक यंत्रे असलेल्या गावाच्या पावसावरच इतर गावांची पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे ते शेतकर्‍यांसाठी व प्रशासनासाठी देखील अडचणीचे ठरत आहेत. तालुक्यातील 87 महसुली गावे आहेत. तर, ग्रामपंचयात 58 आहेत. त्यात फक्त 6 पर्जन्य माफक आहेत. 14 ते 15 गावांसाठी एक पर्जन्यमापक असल्यामुळे एका गावाच्या पावसाच्या नोंदीवर 15 गावांचे भवितव्य अवलंबून आहे.

त्यामुळे प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्रे बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी करत आहेत. तालुक्यातील सरासरी पावसाचे प्रमाण देखील पर्जन्य मापकांमुळे विस्कळीत आहे. या पर्जन्य मापकामुळे शेतकर्‍यांना पीकविमा किंवा नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेता लोक प्रतिनिधींनी याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

नदी खोलीकरणाचा होणार फायदा
तालुक्यात माजी मंत्री राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे बांधले होते. परंतु, त्याला 5 वर्षे झाल्याने बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात गाळ साचून पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. याची दखल घेत आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत-जामखेड डेव्हलमेंट ट्रस्ट, नाम फाउंडेशन, भारतीय जैन संघटना व लोकवर्गणीतून नांदणी नदीचे 10 किलोमीटर खोलीकरण करण्यात आले. याचा फायदा जवळा, नान्नज, बोर्लेसह अनेक गावांना होणार आहे.

..तरच पेरणी करा : कृषी अधिकारी
ज्या भागात पुरेसा पाऊस झाला आहे किंवा 80 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेल्या ठिकाणीच शेतकर्‍यांनी पेरण्या कराव्यात. अन्यथा अपुर्‍या पावसावर पेरण्या केल्यास शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे चांगली ओल झाल्याशिवाय पेरण्या करू नका, असे आवाहन कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

Back to top button