

भोर : पुढारी वृत्तसेवा: भोर तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते बंद होणे, दरड कोसळणे आदी प्रकार होत असतात. यामुळे दळणवळणाची साधने बंद पडतात. अशा परिस्थितीत या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो व नागरिकांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्यपुरवठा करण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे तालुक्यातील 13 गावांतील लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा धान्यकोटा आगाऊ देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
भोर तालुक्यातील हिडोंशी खोर्यातील अनुक्रमे शिळींब, शिरवली हिमा, दापकेघर, गुढे, हिर्डोशी, दुर्गाडी, निंवगण, माझेरी, शिरगाव, वारखंड, कुडली, कुंबळे, कोंढरी तसेच वेल्हे तालुक्यातील कर्णवडी अशा एकूण 13 गावांतील लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्याचा धान्य कोटा आगाऊ देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 अंतर्गत दरमहा नियमित वाटप करण्यात येणारे प्रतिमहिना प्रतिमाणसी 2 किलो गहू 2 रुपये प्रतिकिलो दराने आणि प्रतिमहिना प्रतिमाणसी 3 किलो तांदूळ 3 रुपये प्रतिकिलो दराने जूलै व ऑगस्ट महिन्यासाठी एकत्रितपणे वाटप करण्यात येणार आहे.
याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे प्रतिमहिना प्रतिमाणसी 1 किलो गहू व प्रतिमहिना प्रतिमाणसी 4 किलो तांदूळ जूलै व ऑगस्ट महिन्यासाठी एकत्रितपणे मोफत वाटप करण्यात येणार आहे. अंत्योदय लाभार्थ्यांकरिता दरमहा नियमित वाटप करण्यात येणारे प्रतिमहिना प्रतिकार्ड 15 किलो गहू 2 रु. प्रतिकिलो दराने व प्रतिमहिना प्रतिकार्ड 20 किलो तांदूळ 3 रु. प्रतिकिलो दराने जुलै व ऑगस्ट महिन्यासाठी एकत्रितपणे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत वाटप करण्यात येणारे प्रतिमहिना प्रतिमाणसी 2 किलो गहू व प्रतिमहिना प्रतिमाणसी 3 किलो तांदूळ जूलै व ऑगस्ट महिन्यासाठी एकत्रितपणे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.
हेही वाचा