

केडगाव : पुढारी वृत्तसेवार: चार इयत्तातील विद्यार्थांना एकाच खोलीत शिकवण्याची किमया भांडगाव ( ता. दौंड) गावच्या कारंडे पिंगळे वस्तीवरील शाळेत केली जात आहे. शिक्षकांची ही तारेवरची कसरत येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पायाच बिघडवणारी आहे. धनगर समाजाची वस्ती असणारी ही शाळा सध्या पहिली ते चौथी भरवली जाते. शाळेची पटसंख्या 52 आहे. सर्व मुले धनगर मेंढपाळ समाजातील असल्याने आई-वडिलांचा मूळ व्यवसाय शेळ्या-मेंढ्या पाळणे हा आहे. मुले शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत या अपेक्षेने त्यांना शाळेत पाठविण्यात आले आहे. अशा या शाळेत गेली अकरा वर्षे एकच शिक्षक कार्यरत आहे.
एकाच खोलीत चार वर्ग असल्याने हा एकच शिक्षक कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना कोणता विषय शिकवत असेल आणि त्यांना ते कसा समजवत असतील आणि मुलांनासुद्धा तो कसा समजत असेल, हे कोडे आहे. एकाच खोलीत पहिली ते चौथीची सर्वच मुले एकत्रित असल्याने त्यांचा गोंधळ उडत असणार, हे नक्की पहिली ते चौथी हा विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा पाया आहे. त्याची अशी अवस्था असल्यास या विदयार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यांच्या शिक्षणाचा कणाच मोडला जातो आहे. ही सर्व मुले भटक्या विमुक्त समाजाची आहेत, त्यांच्या शिक्षणाची अशी हेळसांड झाल्यास त्यांच्या भविष्याला परत रानावनात हिंडून शेळ्या-मेंढ्या करण्याचे कामच राहील.
हेही वाचा