रुग्णालयात येण्याचे प्रमाण अत्यल्प; केवळ अडीच टक्केच कोरोना रुग्ण दाखल

रुग्णालयात येण्याचे प्रमाण अत्यल्प; केवळ अडीच टक्केच कोरोना रुग्ण दाखल
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी एक दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालयात दाखल होणार्‍यांचे प्रमाण कमी आहे. दाखल होणारे रुग्ण हे सहव्याधी किंवा जास्त वय असलेले आहेत, इतर रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल करण्याची गरजच भासत नसल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाकडून नोंदविण्यात आले. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण हे 2.5 टक्के एवढे आहे.

सोमवारी चाचण्या वाढविण्यात आल्या तरीही कोरोना रुग्णांची संख्या शंभरपेक्षा खाली असून ती 74 एवढी झाल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सध्या पुण्यामध्ये 750 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये केवळ 20 रुग्णांवर खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील सहा रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली असून, ते सर्वजण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

एकूण दाखल वीस रुग्णांपैकी नायडू रुग्णालयामध्ये दोन जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, रुग्णालयांत दाखल कराव्या लागणार्‍या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे, कोरोनाबाबत घाबरून न जाता काळजी घेणे व लक्षणे असल्यास तपासणी करून घ्या, असा सल्ला महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.

लक्षणांमध्ये नाही बदल

ताप, अंगदुखी, घसा खवखवणे व थकवा येणे हीच प्रमुख लक्षणे आताच्या रुग्णांमध्येही दिसून येत आहेत.
खूप कमी रुग्णांमध्ये जुलाब, उलट्या ही अतिरिक्त लक्षणे आढळून येत आहे.

चाचण्यांच्या केंद्रात वाढ…

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी चाचण्या वाढवून रुग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. मागील पंधरा दिवसांपासून पुणे शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने चाचण्या वाढविण्यावर महापालिकेने भर दिला आहे. सुरुवातीला चाचण्यांची केंद्रे आठ होती. ती संख्या वाढवून पंधरा करण्यात आली आहे. तर पुढील काही दिवसांत ही संख्या आठ करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

रेमडेसिव्हिरचा वापर शून्य…

कोरोनाच्या यापूर्वीच्या लाटांमध्ये गंभीर होणार्‍या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला, परंतु सध्या दाखल रुग्णांपैकी कुणालाच रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले नसून, सर्वांना साधारण नेहमीच्या औषधांनी बरे वाटत असल्याने सध्यातरी रेमडेसिवीरचा वापर शून्य आहे.

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार लस…

'कोरोनाचा संसर्ग वाढत असून, लसीकरण होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शाळा सुरू होणार असल्याने आता शाळेतच विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण होईल,' अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. रुग्ण वाढत असल्याने गेल्या आठवड्यात डॉ. देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली होती. त्या बैठकीत जिल्ह्यात लसीकरण वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लसीकरणात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात 12 ते 14 वयातील शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरणास अद्याप फारशी गती आलेली नाही.

गेल्या काही महिन्यांपूर्वी या मुलांचे लसीकरण सुरू झाले. मात्र, परीक्षा सुरू असल्याने मुलांनी लस घेतली नाही. आता येत्या काही दिवसांत शाळा सुरू होत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच लस देण्यात येईल,' असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. जिल्ह्यात 27 मे ते 3 जून यादरम्यान 3 हजार 423 जणांनी पहिला, तर 25 हजार 391 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

त्याशिवाय 21 हजार 291 जणांनी प्रीकॉशन डोस घेतल्याने या आठवड्यात 50 हजारांहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापाठोपाठ नऊ जूनपर्यंतच्या आठवड्यात विविध वयांतील 61 हजार 422 जणांनी लस घेतली आहे. त्यात प्रीकॉशन डोस घेणार्‍यांची संख्या 32 हजारांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे 27 मे ते 9 जूनपर्यंत दोन आठवड्यांमध्ये जिल्ह्यात 1 लाख 11 हजार 527 जणांचे लसीकरण झाले आहे, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news