कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : 'वाघाचे कातडे घातले म्हणजे शिवसैनिक होता येत नाही,' या संभाजीराजे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय पवार यांनी, 'सर्कशीतील वाघ वेगळे असतात. जंगलातील वाघ वेगळे असतात. शिवसेनेतील वाघ हे जंगली वाघ आहेत,' असे सांगत तुम्ही अशा वाघाकडे पाठिंबा द्या म्हणून का गेलात? तुम्हाला कोणी बोलावले होते काय, असा सवाल करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी संभाजीराजे यांचा बोलावता धनी वेगळा असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पाठिंबा द्या म्हणून मते मागायला तुम्हीच शिवसेनेकडे आला होता. तुम्हाला कोणी बोलावले नव्हते. छत्रपती घराण्याचा शिवसेनेने नेहमीच मानसन्मान राखला आहे. त्यामुळे संभाजीराजे यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका करू नये, असेही पवार म्हणाले.
राज्यसभेच्या निवडणुकीत एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देणारा पक्ष शिवसेनाच आहे.
सर्वांनी विश्वास टाकला, वरिष्ठ पातळीवर यंत्रणाही राबत होती. मात्र, शेवटच्या क्षणी दगाफटका झाला. तो कोठे झाला याचा शोध मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते घेत आहेत. मराठा क्रांती मोर्चे निघाले त्याचे नेतृत्व कोणा एकाकडे नव्हते. त्यामुळे असे मोर्चे माझ्यामुळे निघाले, असे म्हणणे चुकीचे आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.