पणजी बसस्थानकाची दुरवस्था | पुढारी

पणजी बसस्थानकाची दुरवस्था

पणजी; पुढारी वृत्तसेवा : जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या गोव्याच्या राजधानीतील कदंब बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. हे स्थानक पाहिल्यास स्मार्ट सिटी असलेल्या पणजीचे हे बसस्थानक आहे का, असा प्रश्न पडतो. सर्वच ओंगळवाणे दर्शन या बसस्थानकावर गेल्यानंतर दिसून येते.

स्थानकाच्या छप्पराचे उडालेले पत्रे, नको त्या जागी बसवलेलेे सीसीटीव्ही कॅमेरे, दुकानदारांकडून पदपथावर झालेले अतिक्रमण, स्थानकावर दारू पिणे, झोपणे अशा अनैतिक गोष्टी स्थानकात दिसून येतात.

जोरदार पावसाच्यावेळी बस स्थानकावरील काही भागात तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. जवळच्या गटारात टाकलेला कचरा जोरदार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत येऊन परिसर गलिच्छ करतो.

कदंब महामंडळाच्या या बसस्थानकावर एका बाजूच्या काही गाळ्यात मटका घेणारे व्यक्ती बिनदिक्कतपणे बसून मटका घेतात. त्यामुळे देश विदेशातून येणारे पर्यटक व स्थानिक नागरिक येथील अनैतिक गोष्टी बंद होऊन या बसस्थानकाची सुधारणा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बसस्थानकात व्हावी, अशी सूचना करताना दिसतात.

फुल विक्रेत्यांचे अतिक्रमण

पणजी कदंब बसस्थानकावर एका भागात फुल विक्रेते बसतात. मात्र, ते पदपथ अडवतात. काही वर्षापूर्वी या अतिक्रणाविरोेधात कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई काही दिवसांपुरती मर्यादित राहिली. आता पुन्हा तेथे पदपथ अडवले जात आहेत.

Back to top button