कोल्हापूर : नऊ नगरपालिकांत 118 महिलांना मिळणार संधी | पुढारी

कोल्हापूर : नऊ नगरपालिकांत 118 महिलांना मिळणार संधी

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणाच्या सोडती सोमवारी काढण्यात आल्या. ‘कहीं खुशी कहीं गम’ असे चित्र काही ठिकाणी आरक्षण सोडतीनंतर दिसले. या सोडतीकडे बहुतांशी ठिकाणी नागरिकांनी पाठच फिरवली होती. जिल्ह्यातील या नऊ नगरपालिकांच्या एकूण 235 जागांपैकी 118 जागांवर महिला सदस्यांना संधी मिळणार आहे. या आरक्षण सोडतीवर बुधवार (दि. 15) पासून हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. दि. 29 जून रोजी आरक्षण अंतिम केले जाणार आहे.

इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, पेठवडगाव, मलकापूर, पन्हाळा, कागल, मुरगूड आणि गडहिंग्लज या नऊ नगरपालिकांसाठी सोमवारी सकाळी आरक्षण सोडत झाली. ओबीसी

प्रवर्ग वगळून प्रथमच आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर आरक्षण कसे असेल, याची बर्‍यापैकी माहिती अनेकांना मिळाल्याने आरक्षण सोडतीसाठी सभागृहात विशेष अशी गर्दी नव्हती. यामुळे आरक्षणाबाबत उत्सुकता, हुरहूर असे चित्रही फारसे कोठे दिसले नाही.

इचलकरंजी नगरपालिकेतील 64 जागांपैकी 32 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. जयसिंगपूर नगरपालिकेच्या 26 जागांपैकी 13 महिलांसाठी, कुरुंदवाड, पेठवडगाव, मलकापूर आणि मुरगुड नगरपालिकेच्या प्रत्येकी 20 जागांपैकी 10 जागां महिलांसाठी राखीव राहील्या आहेत. कागलमध्ये 23 जागांपैकी 11 जागा तर गडहिंग्लजमध्ये 22 पैकी 11 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये अनुसुचित जातीच्या महिला राखीव प्रवर्गाचाही समावेश आहे.

आरक्षण सोडतीची माहिती बुधवारी प्रसिध्द केली जाणार आहे. यानंतर दि.15 ते दि.21 जून या काळात आरक्षण आणि सोडतीबाबत हरकती स्वीकारल्या जातील. दि. 24 रोजी या हरकती जिल्हाधिकार्‍यांच्या अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना सादर केल्या जातील. दि.29 जून रोजी विभागीय आयुक्त या आरक्षणास मान्यता देतील. ही माहिती दि.1 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Back to top button