रक्तसंकलनात पुणे अव्वल; कोरोना संकटातही रक्तदानात मुंबईनंतर पुण्याचा नंबर

रक्तसंकलनात पुणे अव्वल; कोरोना संकटातही रक्तदानात मुंबईनंतर पुण्याचा नंबर

दिनेश गुप्ता

पुणे : रक्तदानात गेल्या दीड वर्षात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. राज्यात हा विभाग अव्वल ठरला आहे. 'रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते घट्ट' अशी म्हण कानी पडते, ती आजच्या काळात खरी ठरतेय. कारण कोणतीही दुर्घटना घडली की, ब्लड बँकमधून रक्त आणून रुग्णास दिले जाते. जीव वाचवताना आपला अन् परका दिसत नाही. हे घडते ते केवळ रक्तदानाच्या चळवळीतून. कोरोना काळात खर्‍या अर्थाने 'रक्ताचे नाते' जपले असेल तर ते मुंबई व पुणे विभागानेच.

राज्यात कमी कॅम्प भरवून पुणे विभागाने रेकॉर्ड ब्रेक रक्त संकलन करून राज्यातील रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत. हे काम रक्तपेढीचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून पीएच.डी मिळवणार्‍या राज्यातील पहिल्या डॉ. शंकर मुगावे यांनी करून दाखवले आहे. जगभरातील गरजूंना असलेल्या रक्ताची गरज लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रात त्याच्या कार्ल लँडस्टायनर यांनी केलेल्या संशोधनाचा दिवस म्हणजेच रक्तदाता दिवस होय.

प्रत्यक्षात हा दिवस साजरा केला जात असला तरी ऐच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. कोरोनाकाळात रक्ताने खर्‍या अर्थाने नाते काय असते हे दाखवून दिले. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे प्रगती होत असली तरी रक्त कृत्रिम तयार करता येत नाही. म्हणूनच एकदाच्या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचवले जाऊ शकतात, यासाठी रक्तदान करण्यावर भर देत जनजागृती केली जात आहे.

भारतीय स्त्री रक्तदानात मागे….

भारतात स्त्रियांचा व मुलींचा रक्तदानातील सहभाग केवळ सात टक्के असल्याचे आढळून आलेले आहे. असे असले तरी रक्तदान चळवळीत देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. देशात आजमितीस 3023 रक्तपेढ्या असून अकरा पंचेचाळीस मिलियन रक्तपिशव्या गोळा केल्या जातात. यामध्ये 85 टक्के रक्त संकलन इच्छेने रक्तदान करणार्‍यांचे असते.

महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांतून 350 रक्तपेढ्याअंतर्गत 2019 मध्ये 17 लाख 23 हजार 363 एवढे युनिट्स रक्त संकलित केले गेले. संकलित रक्तामध्ये 97.54 ऐच्छिक रक्तदात्यांचे रक्त होते. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या संकटामुळे 15 लाख 25 हजार 826, 2021 मध्ये 16 लाख 73 हजार 373 एवढे रक्त संकलन केले गेले. गेल्या दीड वर्षात म्हणजेच कोरोना कालावधीत रक्त संकलनात राज्याच्या तुलनेत पुणे विभाग आघाडीवरच असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

2021 मधील रक्तसंकलन

मुंबई : 3375 कॅम्प 2,64152 रक्त बॅग
पुणे : 4189 कॅम्प 2,37978 रक्त बॅग

2022 मधील रक्तसंकलन

मुंबई : 1137 कॅम्प 91,363 रक्त बॅग
पुणे : 1279 कॅम्प 91,377 रक्त बॅग

डॉ. मुगावे यांना राष्ट्रीय पुरस्कार

कोरोना महामारीच्या संकटात पाच जिल्ह्यांतील रक्तपेढींच्या मुख्य समन्वयक (रक्तपेढी) म्हणून डॉ. मुगावे यांची नियुक्ती केली गेली. त्यांनी आजपर्यंत 96 वेळा ऐच्छिक रक्तदान केले आहे. गेल्या एकवीस वर्षांत जवळपास साडेतीन लाख रक्तदात्यांचे ऐच्छिक रक्तदान करून घेण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सुवर्णपदकाने सन्मानित केलेले आहे. त्याचबरोबर ए. एन. कश्यप हा रक्तदान चळवळीतील कामगिरीबद्दल 2018 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

कोरोना संकटात रक्तसंकलन कमी झाले असले, तरी राज्यात विभाग अव्वलच आहे. स्वतःहून रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज असून, जनजागृती गरजेची आहे. योगा, व्यायाम याबरोबर रक्तदान करणे गरजेचे आहे, असा प्रचार करावा लागेल.

                        – डॉ. शंकर मुगावे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news