नाशिक : गुणवत्तावाढीसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाची मात्रा

नाशिक : गुणवत्तावाढीसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाची मात्रा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांत नियमितपणे शाळा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे अध्ययन र्‍हास झाले असून भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र या विषयांवर परिणाम झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मोठा विपरीत परिणाम झाल्याने ही कसर भरून काढण्यासाठी या शैक्षणिक वर्षात सर्वच विद्यार्थ्यांसाठी दि. 20 जूनपासून 30 दिवसांच्या पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार मनपा शिक्षण विभागाने प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या सर्वच शाळा व्यवस्थापनांना आदेश जारी केले आहेत.

संबंधित सेतू अभ्यास हा सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक असून, शालेय स्तरावर मुख्याध्यापकांनी सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याची सूचना शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी पत्राद्वारे केली आहे. सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्वचाचणी घेण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांची नोंद ठेवण्याची सूचना केली आहे.

सेतू अभ्यास पूर्ण झाल्यावर त्या त्या इयत्तेच्या विषयाचे नियमित अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात यावी. तसेच शालेय स्तरावर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यासाठी त्यांचे खास उद्बोधन सत्र आयोजित करण्यात आले होते. सेतू अभ्यासाबाबत केंद्रप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापकांना अवगत करावे. तसेच सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शाळाभेटीच्या आधारे केंद्रप्रमुखांनी आपापल्या केंद्रातील शाळांचा एकत्रित केंद्रनिहाय अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप
इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. अभ्यासक्रम इयत्ता व विषयनिहाय तयार करण्यात आला असून, मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 30 दिवसांचा आहे. त्यात दिवसनिहाय कृतिपत्रिका देण्यात आलेल्या असून, हा अभ्यासक्रम मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमात आहे. सेतू अभ्यासक्रमात पूर्व चाचणी व उत्तर चाचणीचा समावेश करण्यात आलेला आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी

पूर्व चाचणी – दि. 17 ते 18 जून 2022

30 दिवसांचा सेतू अभ्यास-दि. 20 जून ते 23 जुलै 2022

उत्तर चाचणी-दि. 25 ते 26 जुलै 2022

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news