मुलाकडूनच बापाचा खून; मृतदेह बोपदेव घाटात फेकला

मुलाकडूनच बापाचा खून; मृतदेह बोपदेव घाटात फेकला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मद्यप्राशन करून त्रास देत असल्याच्या कारणातून मुलानेच मावसभावाच्या साथीने आपल्या पित्याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दुचाकीवरून मध्यरात्री बोपदेव घाटातील सेल्फी पॉइंट परिसरात टाकून दिला. अतिशय कौशल्यपूर्वक तपास करून कोंढवा पोलिसांनी खुनाचा छडा लावून दरभंगा एक्स्प्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मुलाला व त्याच्या मावसभावाला रेल्वे स्टेशन येथून अटक केली.

सोनू पवन शर्मा (वय 25), शैलेंद्र गोवर्धन अहिरवार (वय 22, रा. दोघे, मानाजीनगर, नर्‍हेगाव. मूळ मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पवन देबू शर्मा ( रा. मानाजीनगर, नर्‍हे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी मृतदेहाच्या फोटोवरून खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यास सुरुवात केली होती. 14 जून रोजी पोलिस अंमलदार तुषार आल्हाट यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खून झालेल्या व्यक्तीचे नाव पवन शर्मा असून, तो मिस्त्री काम करतो. तो नर्‍हे येथील मानाजीनर येथे राहण्यास आहे. त्यानुसार पोलिसांनी शर्मा याच्या घराचा पत्ता शोधून काढला.

त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता, मुलगा सोनू व तिच्या बहिणीचा मुलगा शैलेंद्र याच्यासह एकत्र राहत असल्याचे सांगितले.
पवन हा दारू पिऊन आल्यानंतर तिला व तिच्या मुलाला नेहमीच मारहाण करत असल्याचे सांगितले. 13 जून रोजी दारू पिऊन आल्यानंतर पवन याने दोघांना मारहाण केली होती. मात्र, रात्रीपासून पती, मुलगा व बहिणीचा मुलगा तिघे घरी आले नसल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्यानंतर त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला त्यावेळी दोघे रेल्वे स्टेशन येथून मूळ गावी मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील, संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, कर्मचारी जोतिबा पवार, सतीश चव्हाण, विशाल ठोंबरे, सागर भोसले यांच्या पथकाने खून झालेल्या व्यक्तीचा कोणताही पुरावा नसताना कौशल्यपूर्वक तपास करून खुनाचा छडा लावला.

दरभंगा एक्स्प्रेसमधून आरोपीला उचलले

पवन शर्मा हा मुलगा सोनू आणि त्याची आई यशोदा या दोघांना दारू पिऊन आल्यानंतर सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता. सतत होणार्‍या त्रासाला सोनू कंटाळला होता. त्यातूनच त्याने वडील पवन याचा खून करण्याची योजना आखली. खून केल्यानंतर मृतदेह कोठे टाकायचा, यासाठी विविध ठिकाणची पाहणी केली. त्यासाठी त्यांनी बोपदेव घाटाची निवड केली. मध्यरात्रीच्या वेळी पवन याचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर दुचाकीवरूनच त्याचा मृतदेह बोपदेव घाटात टाकून दिला. तसेच पोलिस आपल्याला पकडू नयेत, याचीदेखील खबरदारी घेतली. मात्र, पोलिसांनी दोघांना दरभंगा एक्स्प्रेसमधून बेड्या ठोकल्या.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news