प्राण्यांसाठी कोरोनावरील ‘अ‍ॅन्कोव्हॅक्स’ लस विकसित | पुढारी

प्राण्यांसाठी कोरोनावरील ‘अ‍ॅन्कोव्हॅक्स’ लस विकसित

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : कोरोनावरील मानवी उपयोगाची लस बाजारात सक्रिय होऊन वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर आता जनावरांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नवी लस सज्ज झाली आहे. हिस्सार (हरियाणा) येथील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वॉईन्स या संस्थेने ही लस विकसित केली आहे. ‘अ‍ॅन्कोव्हॅक्स’ या नावाने ही लस बाजारात उतरणार आहे. या लसीपासून जनावरांचे कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन विषाणूंपासून संरक्षण होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने नुकतीच या लसीची घोषणा केली. ‘अ‍ॅन्कोव्हॅक्स’ ही लस कुत्रा, सिंह, बिबट्या, उंदीर आणि ससा या प्राण्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कोरोनाच्या डेल्टा या प्रतिरूपाच्या संसर्गिक भागापासून ही लस बनविण्यात आली आहे. शिवाय, त्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अलहैड्रोजेन हे सहाय्यभूत ठरणारे औषधी घटकही वापरण्यात आले आहेत.

भारतामध्ये चेन्नई प्राणीसंग्रहालयातील नऊ वाघ व सिंहांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले होते. यापैकी एक सिंहीण कोरोनामुळे मृत्युमुखी पडली होती. यामुळे वन्यजीवांच्या रक्षणासाठी ही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू होते. वन्यजीवांनाच कोरोनाची लागण होत असल्याने त्याचा वन पर्यटनावरही परिणाम दिसून येत होता. या नव्या लसीमुळे हा धोका दूर होईल, असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

जनावरांसाठीची देशातील पहिलीच लस

भारतात जनावरांसाठी बनवलेली कोरोनावरील ही पहिली लस आहे. यापूर्वी गतवर्षी रशियाने अशी लस बनविल्याचे वृत्त होते. ही लस कुत्रा, मांजर आणि कोल्हा यांच्यासाठी उपयुक्त ठरल्याचा दावा केला होता. या लसीपासून प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचे संरक्षण होईल. एका प्राण्यापासून दुसर्‍या प्राण्याला होणारा संसर्ग, शिवाय प्राण्यांपासून मानवाला होणार्‍या संसर्गाला आळा घालता येणे शक्य होणार आहे.

Back to top button