दहावी निकाल : ४० हजार विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक; आज ऑनलाईन रिझल्ट | पुढारी

दहावी निकाल : ४० हजार विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक; आज ऑनलाईन रिझल्ट

सातारा; पुढारी वृत्तसेवा : आठ दिवसांपूर्वी बारावी निकाल लागल्याने दहावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालक वर्गामध्ये वाढली होती. ही उत्सुकता आता संपत असून दहावी राज्य बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर होणार आहे. मागील दोन वर्षे परीक्षा न झाल्याने तब्बल दोन वर्षांनी दहावी बोर्ड परीक्षेव्दारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिध्द होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 39 हजार 903 विद्यार्थ्यांना निकालाची धाकधूक वाढली आहे.

कोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रातही अनेक बदल झाले आहे. मागील दोन वर्षे शिक्षण ऑनलाईन सुरु राहिल्याने परीक्षाही रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी दहावी परीक्षा दिलेले विद्यार्थी तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षेला सामोरे गेले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा तिथे केंद्र केल्याने परीक्षा केंद्रांची संख्याही वाढली होती. यावर्षी जिल्ह्यातील 763 केंद्रांवर दहावी बोर्ड परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये 39903 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हे सर्व विद्यार्थी कोरोना नियमावलीचे पालन करुन, काळजी घेत परीक्षेला सामोरे गेले आहेत. दहावी व बारावी नंतरच विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशा ठरत असल्याने या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची विशेष उत्सुकता वाढली आहे. शुक्रवार दि. 17 जून रोजी दहावीचा निकाल लागणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाची धाकधूक वाढली आहे.

यावर्षी दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी इयत्ता आठवी व नववीमध्ये अंतर्गत मूल्यमापनावर वरच्या वर्गात प्रविष्ठ करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर झालेल्या ऑफलाईन परीक्षेतून गुणवत्ता सिध्द होणार आहे. दहावी निकालानंतरच व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमांबरोबरच इतर विद्याशाखांचे प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.

गुण पडताळणी प्रक्रिया 20 पासून

दहावीचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयातील मिळालेल्या गुणांची पडताळणी किंवा छायाप्रतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 20 जूनपासून सुरु होत आहे. गुण पडताळणीसाठी दि. 29 जून, छायाप्रतीसाठी दि. 9 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून शुल्कही ऑनलाईनच भरता येणार आहे. त्यासाठी https://verification.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन राज्यमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Back to top button