

श्रीकांत बोरावके
आळंदी : माहेरघराचा निरोप घेत माउलींची पालखी बुधवारी (दि. 22) सकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. या वेळी सर्व आळंदीकर आपल्या माउलींना निरोप देताना भारावले होते. महिनाभराचा दुरावा ठेवत माउली पुण्याकडे मार्गस्थ झाली. माउलींची साद घेत वाहत असणारी इंद्रायणी चंद्रभागेला गळाभेट घेण्यासाठी जोरदारपणे वाहत असल्याचे काहीसे चित्र होते. हरिनामाच्या गजरात मंगळवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले होते.
तद्नंतर ती पहिल्या मुक्कामासाठी जुन्या गांधीवाडा आजोळघराच्या व आत्ताच्या नवीन दर्शनबारी मंडपात दाखल झाली होती. सकाळी नित्य धार्मिक विधी उरकत शितोळे सरकार यांच्या वतीने नैवेद्य दाखविल्यानंतर पालखी साडेसहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. या वेळी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी वारकर्यांसाठी पंचक्रोशीतील गावकर्यांनी चहा, नाष्ट व फळे मोफत उपलब्ध करून देत वारीत आपला सहभाग नोंदविला.
सकाळी साडेआठच्या सुमारास पालखी विसाव्यासाठी थोरल्या पादुका मंदिर, भोसरी फाटा, साईमंदिर येथे विसावली. येथे समाज आरती घेण्यात आली. तद्नंतर पालखी दुपारच्या विसाव्यासाठी फुलेनगरकडे रवाना झाली. चर्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, दिघी मॅगझीन, साई मंदिर आदी भागांतील नागरिकांसह पंचक्रोशीतील मोशी, डुडुळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, गोलेगाव गावांतून नागरिक माउलींना निरोप द्यायला पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पोलिसांच्या वतीने पालखी मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जसजशी पालखी पुढे मार्गस्थ होत होती तसतसे मागील रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जात होते.
हेही वाचा