खाशाबा जाधवांच्या पुरस्काराचा विसर

खाशाबा जाधवांच्या पुरस्काराचा विसर
खाशाबा जाधवांच्या पुरस्काराचा विसर

सातारा : विशाल गुजर तब्बल चार दशकानंतर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने देशाला कांस्यपदक मिळवून दिले. त्यामुळे या संघाला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. 1952 साली भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणार्‍या सातार्‍याच्या खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार अद्यापही दिलेला नाही. त्याचा विसर शासनाला पडला आहे. हा कुस्ती क्षेत्रासह खाशाबा जाधवांवर होणारा अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्‍वर येथील पै. खाशाबा जाधव यांनी 1952 साली हेलसिंकी येथे झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत 52 किलो फ्रीस्टाईल वैयक्तिक कुस्ती प्रकारात देशाला कांस्यपदक मिळवून दिले होते. त्यांच्या या कामगिरीनंतर विविध प्रकारातील अनेक खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले. या सर्व खेळाडूंना केंद्र सरकारने पद्म पुरस्कार देऊन गौरवले. त्यानंतर अनेक स्पर्धकांनी ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांचाही केंद्र सरकारने योग्य गौरव केला. मात्र, देशाला ऑलिंपिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे मृत्यूनंतरही पद्म पुरस्कारापासून वंचितच आहेत.

गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ त्यांचे पुत्र रणजित जाधव व कुस्ती मल्ल विद्या ही संस्था सातत्याने यासाठी पाठपुरावा करत आहे. गतवर्षी यासाठी जाधव यांनी दिल्लीपर्यंत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांची भेट घेतली. पद्म पुरस्कार समितीला ज्या पद्धतीने प्रस्ताव हवा त्याप्रमाणे करुनही दिला. यावर शेकडो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या शिफारशीही घेतल्या. तरीसुद्धा पुरस्कार जाहीर न झाल्याने पदरी निराशाच आली आहे. यावर्षी तब्बल 41 वर्षांनी हॉकीमध्ये भारताने कांस्यपदक पटकावले. ही बाब देशवासियांसाठी भूषणावह आहे. त्याहीपेक्षा मेजर ध्यानचंद यांचे खेलरत्नला नाव दिले ही चांगली बाब आहे. मात्र, हे करत असताना खाशाबा जाधव यांच्या ऑलिंपिक पदकाकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जागतिक ऑलिंपिक दिन विशेष

प्रशिक्षण केंद्राचेही काम रखडले एकीकडे पद्म पुरस्कारापासून वंचित असतानाच दुसरीकडे ऑलिंपिकवीर स्व. पै. खाशाबा जाधव राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे कामही अद्याप रखडले आहे. हे काम रखडल्याने वारंवार आंदोलने करण्यात आली मात्र, यावेळी फक्त संबंधित यंत्रणेकडून फक्त आश्‍वासने देण्यात आली आहेत. याबाबत अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news