राजापूर : बारसूमध्ये रिफायनरीचा मार्ग मोकळा | पुढारी

राजापूर : बारसूमध्ये रिफायनरीचा मार्ग मोकळा

राजापूर , पुढारी वृत्तसेवा :   तालुक्यात नव्याने धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत केंद्र आणि सरकार पातळीवर तसेच स्थानिक पातळीवर गेल्या काही दिवसांत सकारात्मक घडामोडी घडत आहेत. तर सोमवारी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे व कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली तर स्थानिक धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील शेतकरी व जमीन मालकांनी तीन हजार एकर जमिनींची संमतीपत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द केली आहेत. त्यामुळे आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

प्रकल्पाबाबत घडत असलेल्या या सकारात्मक घडामोडींमुळे प्रकल्प समर्थकांसह स्थानिक धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील शेतकरी, जमीन मालक, बेरोजगार तरुण आणि खास करून हा प्रकल्प राजापुरात झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी करत प्रसंगी समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार्‍या महिला रणरागिणींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात राजापूर तालुक्याचेच नाही तर रत्नागिरी जिल्हा, संपूर्ण कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे भवितव्य उज्वल होणार आहे. आर्थिक आणि सामाजिक विकासाची नवीन द्वारे या प्रकल्पाच्या माध्यमातून खुली होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प राजापुरात व्हावा, यासाठी तालुक्यातील सुमारे 55 विविध सामाजिक सामाजिक संघटना, राजापूर नगर परिषदेसह 57 ग्रामपंचायती, रत्नागिरी जिल्हयातील 25 सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेत या प्रकल्पाचे समर्थन करत हा प्रकल्प राबविण्याची मागणी केली आहे तर आता शिवसेनेसह सर्वच राजकिय पक्षांनी नव्याने होत असलेल्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात शून्य विस्थापनाच्या मुद्द्यावर या प्रकल्पाला पाठींबा दिला आहे.

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी हा प्रकल्प झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला तर समर्थकांच्या भक्कमपणे पाठीशी उभे रहातानाच भाजपाच्या माध्यमातुन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना आमदार राजन साळवी यांनीदेखील आता या प्रकल्पापासून होणारे फायदे आणि विकासात्मक बदल लक्षात घेऊन या प्रकल्पाचे समर्थन करताना या प्रकल्पाला बाहेरून येऊन विरोध करणार्‍यांचा पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी केली आहे.

सध्या या प्रकल्पाबाबत असलेल्या सकारात्मक वातावरण पाहता आता या प्रकल्पाला थेट दिल्लीतूनच लवकरात लवकर चालना मिळणार आहे. तर सोमवारीच ज्या भागात हा प्रकल्प प्रस्तावित आहे त्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात स्थानिक जमीनमालक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी, एमआयडीसी अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीत अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाली. तर हा प्रकल्प आमच्या धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरात राबवावा, अशी मागणी करत स्थानिक शेतकर्‍यांनी तीन हजार एकर जमिनीची संमतीपत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द केली आहेत.

या प्रकल्पाबाबत बाहेरून येऊन स्थानिक जनतेत गैरसमज पसरविणार्‍यांविरोधातही कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांनी केली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य पातळीबरोबरच आता स्थानिक पातळीवरही प्रकल्प मार्गी लावावा, यासाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत. निश्चितच ही बाबत राजापूर तालुका वासीयांसाठी सुखावह अशी असून पुढील काही दिवसात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे.
या सकारात्मक अशा घडामोडींमुळे प्रकल्प समर्थकांसह धोपेश्वर, बारसू, गोवळ परिसरातील स्थानिक शेतकरी, जमीन मालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रीही सकारात्मक
सोमवारी ना. राणे, नीलेश राणे व प्रमोद जठार यांनी थेट दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. हा प्रकल्प राजापूर तालुक्यात झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी करताना या तिन्ही नेत्यांनी याबाबत लवकरात लवकर अंमलबजावणी केली जावी, अशी मागणीही पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली. ना. पुरी यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवीत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

Back to top button