माघारी फिरा, अन्यथा अपात्र करू
माघारी फिरा, अन्यथा अपात्र करू

माघारी फिरा, अन्यथा अपात्र करू

Published on

सातारा : पुढारी वृत्तसेवा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली. याबाबतची नोटीस पक्षाच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देण्यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव गेले असता त्यांना ती देण्यास व भिंतीवर चिकटवण्यास विरोध केला. दरम्यान, बैठकीस उपस्थित न राहिल्यास विधानसभा सदस्यत्व अपात्र करण्याचा इशाराही नोटिशीत देण्यात आला. अशीच नोटीस कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनाही देण्यात आली आहे.

पक्षातर्फे दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यातील घडामोडींवर बैठक आयोजित केली आहे. पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती पाहता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक आयोजित केली आहे. त्यासाठी आपली उपस्थिती आवश्यक आहे. ही नोटीस विधिमंडळात नोंद केलेल्या ई-मेल व पत्त्यावर पाठविण्यात आली आहे.

या बैठकीस लिखित व पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणाला गैरहजर राहता येणार नाही. उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्ष सोडण्याचा इरादा आहे असे मानले जाईल. त्यानंतर संविधानानुसार आपल्यावर विधीमंडळ सदस्यत्वाच्या अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असेही मुख्य प्रतोद शिवसेना विधिमंडळ पक्ष सुनिल प्रभु यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या नोटीसीत म्हटले आहे.

याबाबत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, शंभूराज देसाई हे आमच्या पक्षाचे आमदार व मंत्री आहेत. पक्षाच्या बैठकीसाठी सर्व आमदार उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यानुसार पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ही नोटीस पाठवली आहे. ती नोटीस देण्यासाठी आलो आहे. पक्षाच्या नियमानुसार नोटीस दिली जाणार आहे. मात्र, ही नोटीस ना. देसाई यांच्या घरातील सदस्यांना देण्यास व भिंतीवर चिकटवण्यासही पोलिसांनी प्रतिबंध केला आहे.
दरम्यान, कोरेगाव-खटाव विधानसभा मतदार संघाचे आ. महेश शिंदे यांनाही शिवसेने नोटीस बजावली आहे. त्यांच्या खटाव येथील निवासस्थानावर ही नोटीस शिवसैनिकांनी चिकटवली आहे. यावेळी शिवसेना उजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, तालुकाप्रमुख दिनेश देवकर व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रभूंनी पाठवलेली नोटीस अवैध : आ. महेश शिंदे

शिवसेना विधिमंडळ मुख्य पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीला आ. महेश शिंदे यांनी उत्तर दिले आहे. त्यामध्ये शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयातून पक्षाच्या अधिकृत लेटर हेडचा आपण गैरवापर केला आहे. गटनेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षाच्या 45 आमदारांची बैठक झाली असून, या बैठकीमध्ये आपणाला मुख्य प्रतोद पदावरून एकमताने दूर करण्यात आले आहे. शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. आपणाला सहीचा अधिकार नसतानाही आपण दि. 22 जून रोजी विधीमंडळ पक्ष कार्यालयाच्या पत्रानुसार मला कायदेशीरदृष्ट्या अवैध नोटीस पाठवली आहे. तरी ही नोटीस पाठवण्याचा आपणास कुठलाही अधिकार नाही, असे आ. महेश शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news