

पुणेः पुढारी वृत्तसेवा: दगड मारून कारचे नुकसान करणार्या मद्यपी रिक्षाचालकाला रोखल्याने त्याने पेट्रोलिंग करणार्या पोलिसांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास पाषाण-सूस रोडवरील हॉटेल रोनितजवळ घडली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी अनिल प्रकाश सदाशिव (वय 32, रा. पाषाण, मूळ अकोला) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी दत्तात्रय गेंगजे (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गेंगजे आणि त्यांचे सहकारी जारवाल हे दुचाकीवरून पाषाण चौकी परिसरात गस्त घातल होते. त्या वेळी आरोपी अनिल हा मद्यप्राशन करून रिक्षा चालवून बाजूला थांबलेल्या एका कारचे दगडाने नुकसान करीत होता. त्या वेेळी कारमधील व्यक्तींनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. त्या वेळी गेंगजे आणि त्यांचे सहकारी जारवाल हे दोघे तेथून निघाले होते. त्यांनी अनिल याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने दोघा पोलिसांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अनिल याला पोलिस चौकत गाडीतून घेऊन जात असताना त्याने सार्वजनिक ठिकाणी आरडा -ओरडा करून शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादींना शिवीगाळ करून धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कोळी करीत आहेत.
हेही वाचा