बिहारच्या रस्त्यावरुन प्रशांत किशोर यांची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका | पुढारी

बिहारच्या रस्त्यावरुन प्रशांत किशोर यांची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका

पटना; पुढारी ऑनलाईन : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यातील खराब रस्त्यामुळे पुन्हा एकादा टीकेचे धनी बनत आहेत. प्रत्येक सभेत राज्यात रस्त्यांचे जाळे बनविण्याचा दावा करणारे मुख्यमंत्री सध्या मधुबनी जिल्ह्यातील नॅशनल हायवेच्या खराब अवस्तेमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. भारतमाला प्रोजक्ट अंतर्गत येणाऱ्या एनएच २२७ (एल) या कलुआही ते हरखाली या रस्त्यावर जवळजवळ दीडशेहून अधिक खड्डे पडले आहेत. तसेच हे खड्डे साधारण ११० फूट लांब आणि ५० फूट रुंद इतके मोठे आहेत. तसेच प्रत्येक १० ते २० फूटानंतर एक खड्डा आहे. शिवाय या खड्ड्यांची खोली जवळजवळ तीन फूट इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. अगदी किरकोळ पावसामुळेसुद्धा या खड्ड्यांना तळ्याचे स्वरुप आले आहे.

दैनिक भास्कर वृत्तपत्राचे पत्रकार प्रवीण ठाकूर यांनी घेतलेल्या फोटोत या रस्त्याची भीषण अवस्था सर्व काही बोलत आहे. अगदी किरकोळ पावसाने हा रस्ता नव्हे तर तळ्यांची रांग लागल्यासारखी दिसत आहे. या फोटो स्पष्ट दिसत आहे की, एक किलोमीटरहून अधिक लांबच्या रस्त्यावर जवळपास २३ हून अधिक खड्डे दिसून येत आहेत. अशाच प्रकारे कलुआही पासून हरलाखी पर्यंत २० किलोमीटरच्या अंतरावरील खड्डे अत्यंत धोकादायक बनले आहेत. रस्ते निर्मिती व दुरुस्ती विभागाद्वारे वेळीच रस्ता न दुरुस्त केल्याने आता हा रस्ता एकप्रकारे जीवघेणारा सापळाच बनला आहे.

दैनिक भास्कर या वृत्तपत्राने दिलेल्या रस्त्याची बातमी व व्हिडिओ राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शेअर करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. ते गुरुवारी (दि. २३) आपल्या ट्वीटर अकाउंट वरुन ट्वीट करत म्हणाले, मधुबनी जिल्ह्यातला हायवे २२७(एल) पाहिल्यावर ९० च्या दशकातील जंगलराजमध्ये बिहारचे रस्ते जसे होते त्याची आठवण होते. अलिकडेच मुख्यमंत्री नितीश कुमार एका कार्यक्रमादरम्यान आपल्या रस्ते निर्माण करणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांना सांगत होते की, बिहार मधील चांगल्या रस्त्यांविषयी सर्वांना सागितले पाहिजे.

रस्त्याला लागून असणाऱ्या दुकानदार व व्यापाऱ्यांनी सांगितले की, उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक संकटाचा सामना करावा लागतो आहे. अनेकवेळा रस्त्यावर अपघात होत आहेत. वारंवार रस्ता दुरुस्तीसाठी निवदेन दिले गेले आहे. परंतु, याच्याकडे लक्ष दिले गेले नाही. दुसरीकडे रस्ता बनविणाऱ्या कंत्राटदाराचे म्हणणे आहे की, रस्त्याचे संपूर्ण बील न मिळाल्यामुळे रस्त्याचे काम बंद आहे. पण, बहुतांशी अभियंत्यांचे म्हणणे आहे की, कंत्राटदार आपली मनमानी करत आहेत.

Back to top button