पुणे : पिरंगुटच्या विभाजनास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

पुणे : पिरंगुटच्या विभाजनास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पिरंगुट गावचे दोन गटात विभाजन झाल्याने ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला आहे. सरपंच चांगदेव पवळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ठराव करत या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हरकत घेण्याचे ठरवले आहे.

पिरंगुट ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1,2,3 चा समावेश पिरंगुट गणात करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 4,5,6 चा समावेश भूगाव गणात करण्यात आलेला आहे. परिणामी मोठी लोकसंख्या असूनही पिरंगुट गावचे दोन गटात विभाजन झाले आहे. या प्रभागरचनेला ग्रामस्थांचा विरोध असून त्यासाठी बुधवारी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यामध्ये पिरंगुट गावच्या विभाजनाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचे जाणवले. गावचे विभाजन झाल्याने पिरंगुट गावच्या एकत्रित कारभाराला बाधा निर्माण होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विविध विकास कामांमध्ये अडचण होणार आहे.

विशेष ग्रामसभेत घेतलेली हरकत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हरकत फेटाळल्यास तातडीने उच्च न्यायालयामध्ये ग्रामस्थांच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेवर ग्रामस्थ एकत्रित येऊन बहिष्कार घालणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.

पिरंगुट गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असून एकाच पंचायत समिती गणात गावाचा समावेश करावा. किंवा शेजारील लगतच असलेल्या आवश्यक लोकसंख्येची गावे पिरंगुट गणाला जोडावी, अशीही मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news