

पुणे : पुढारी वृत्तसेवा : टंचाईग्रस्त भागांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे तसेच भूगर्भातील पाणीपातळी वाढावी, यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव'अंतर्गत अमृत सरोवर योजना राबवली जात आहे. जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवर बांधकाम किंवा तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील 90 तलावांची निवड करण्यात आली असून, त्यातील 48 तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.
अमृत सरोवराच्या माध्यमातून पावसाचे पाणी भूगर्भात मुरवले जाणार आहे. त्यातून भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्याचे प्रयत्न केले जात असून, 15 ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात नवीन तलावांची निर्मिती करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, तर पुढील वर्षासाठी नवीन 75 तलावांची नावे निश्चित झाली असून, ही प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागामार्फत राबवली जात आहेत.
जिल्ह्यांमधून काही गावांत अमृत सरोवरांची निर्मिती करता येत नसेल, त्या ठिकाणी उपलब्ध तलावातील गाळ काढणे, तलावाचे पुनरुज्जीवन करणे आदी कामे करून तलावातील पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तलाव पुनरुज्जीवन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे. तर त्यासाठी लागणार्या इंधनाची जबाबदारी ही नाम फाउंडेशनने घेतली आहे, तसेच तलावाची किरकोळ दुरुस्ती केली जाणार आहे. दरम्यान, या कामासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, 15 वा वित्त आयोग, कृषी सिंचन योजना यासह इतर योजनांचा निधी वापरता येणार आहे.
जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती होणार आहे. त्यासाठी सखल भाग, पावसाच्या पाण्याचा मार्ग यासह इतर बाबी तपासूनच जागेची निवड करण्यात आली आहे. एक एकर क्षेत्रात होणार्या एका अमृत सरोवरामध्ये 10 हजार क्युबिक मीटर पाणी साठवण क्षमता असणार आहे.
आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत अमृत सरोवर योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात 75 तलावांची निवड करायची होती; परंतु पुणे जिल्ह्यात 90 तलावांची निवड करण्यात आली आहे. त्यातील 48 ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे. सध्या तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले असून, यातील बहुतांश कामे पूर्ण होतील. पुढील वर्षी नवीन 75 पाझर तलाव बांधले जाणार आहेत.
– डॉ. वनश्री लाभशेटवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो), पुणे.