

फोंडा : पुढारी वृत्तसेवा; भटवाडी-शिरोडा येथील महिलेच्या खून प्रकरणातील संशयित पतीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, या दाम्पत्याला असलेल्या अडीच वर्षांचा मुलगा 'लकी'चे काय? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. आई वारली, वडील तुरुंगात मग लकीचं काय…? कोणताही दोष नसतानाही लकीला मात्र सध्या अपना घरामध्ये राहवे लागत आहे.
ओरिसा राज्यातून सहा वर्षांपूर्वी राजकिशोर नाईक हा रिता बडाकिया हिच्यासह गोव्यात पळून आला. राजकिशोर आणि रिताचे एकमेकांवर प्रेम होते. पण दोन्ही घरच्यांचा विरोध होता. हा विरोध डावलूनच राजकिशोर आणि रिताने गोवा गाठले. मोलमजुरी करून त्यांनी संसार चालवला आणि या संसार वेलीवर लकीच्या रुपाने फुल उमलले. दोघांचाही आनंद द्विगुणीत झाला. पण हे सुख दीर्घकाळ काही टिकले नाही.
एक वर्षांपूर्वी राजकिशोर आणि रिता लकीसह शिरोड्यात रहायला आली. भाड्याच्या खोलीत त्यांनी संसार थाटला आणि नंतर जे काही घडले ते आक्रीतच! रिताचे अन्य कुणाशी तरी संधान असल्याचा संशय राजकिशोरला आला आणि नंतर घरात सुरू झाली रोजची भांडणे. त्यातून रविवारी 5 तारखेला दुपारी कडाक्याच्या भांडणावेळी राजकिशोरने रिताचा गळा आवळला आणि सगळं काही संपलं. राजकिशोरने रिताचा गळा आवळून तिला रागाच्या भरात ठार मारली खरी, पण नंतर त्याला पश्चाताप झाला, पण नंतर पश्चाताप होऊन काय उपयोग. फोंडा पोलिसांनी या खून प्रकरणी संशयित राजकिशोरला पकडले. सध्या तो कोलवाळ तुरुंगात आहे. इकडे रिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झालेले नाहीत, तर एकमेव गोंडस मुलगा आई बापाचे छत्र हरपल्याने आता अपना घरामध्ये राहत आहे.
फोंडा पोलिसांनी राजकिशोर व रिताच्या कुटुंबियांना या घटनेसंबंधी कळवले आहे, पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे रितावर अंत्यसंस्कारही खोळंबले आहे. लकीला या दोन्हीपैकी एका कुटुंबाच्या स्वाधीन करायचे काम शिल्लक आहे. अशा स्थितीत राजकिशोर असंबद्ध बोलतोय. त्याच्या मनावर बराच परिणाम झाला आहे. त्याला फक्त व्यसन ते गुटख्याचे. त्यामुळे राजकिशोरला बांबोळीतील मानसोपचार इस्पितळात दाखल केले, तर तो ठिक असल्याचे सर्टिफिकेट तेथील डॉक्टरांनी दिले आहे, मात्र गुंता कायम आहे.
फोंडा पोलिसांनी ओरिसाला या दोन्ही कुटुंबियांकडे प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी पोलिसांना पाठवण्याचे ठरवले आहे. या प्रत्यक्ष संपर्कात दोन्ही कुटुंबियांनी लकीची जबाबदारी स्वीकारली तर ठीक, अन्यथा लकीच्या नशिबी अपना घरशिवाय दुसरा पर्याय नाही.
हेही वाचा